नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon
तालुक्यातील चिंचविहीर येथे शेतकर्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी अवस्थेत शेतकर्याला नांदगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचाचारासाठी दाखल करण्यात असून प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दोन शेळ्या तसेच हरण, कुत्रा या प्राण्यांचीही शिकार केल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले असून शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा पिंजरा लावून तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
शेतात आपल्या पत्नीसह काम करत असताना शेतकरी विक्रम दाणेदार विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात असताना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला त्यांच्या पत्नीने वाचविण्यासाठी केली असता पत्नीवरही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शेतकरी आजूबाजूचे शेतकरी धावून आल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. सुदैवाने दोघेही थोडक्यात बचावले. गेल्या महिनाभरात बिबट्याने दोन हरीण, चार कुत्रे, शेळ्या, वासरू, गाय, बोकड आदी अन्य प्राण्यांना भक्ष केले आहे.
या परीसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली होती. घाटमाथ्यावर गेल्या चार दिवसांपूर्वी लोढरे शिवारात मादी बिबट्याचा बछड्यासह वावर असल्याचे दिसून आले होते. यामुळे घाटमाथावर पाच पिंजरे लावण्यात आले असून शेतकर्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.