Thursday, May 2, 2024
Homeधुळेधुळे जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

धुळे जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आज जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. परंतू बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -

शहरातील बाजारपेठा, दैनंदिन व्यवहार, शासकीय, खासगी कार्यालय, रिक्षा, एसटी बस सेवा सुरळीत सुरु होती, हमाल मापाडी संघटना बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे बाजार समितीचे व्यवहार ठप्प होते, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व इतर मित्रपक्ष बंदमध्ये सहभागी झाले होते.

धुळ्यासह शिरपूर, साक्री, शिंदखेडा, दोंडाईचा येथे आंदोलन करण्यात आले.बंद आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 11 वाजेनंतर धुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर अभय कॉलेजसमोर रास्तारोको आंदोलन केले.

या आंदोलनात ज्येष्ठ नेते एम.जी.धिवरे, शिवसेनेचे हिलाल माळी, प्रफुल्ल पाटील, काँग्रेसचे शामकांत सनेर, युवराज करनकाळ, राष्ट्रवादीचे किरण शिंदे, सुनिल नेरकर, रणजीत राजे भोसले यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल मापाडी कामगार संघटनेने बंदला समर्थन म्हणून मोर्चा काढला. हा मोर्चा मुंबई-आग्रा महामार्गावरील पारोळा चौफुलीजवळ धडकला.

तेथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेनेही महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.

या आंदोलनात जितेंद्र अहिरे, महेंद्र शिंदे, मनिष दामोदर, रोहिणी जगदेव आदींसह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

बंदला सरकारी कर्मचारी संघटनेनेही पाठिंबा दिला. संघटना प्रत्यक्ष बंदमध्ये सहभागी झाली नाही परंतू भोजनकाळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जिल्हा परिषदसमोर निदर्शने करण्यात आली.

अशी माहिती संघटनेचे डॉ. संजय पाटील यांनी दिली. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या