पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
पांढर्या सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून येत आहे. सध्या कापसाचा भाव सरासरी 6 हजार 900 रुपयांदरम्यान आहे. काही ठिकाणी कमाल सरासरी भाव 7 हजार 500 रुपयांनी खरेदी करण्यात आला. शेतकर्यांनी अफवावर विश्वास न ठेवता गरजेनुसार बाजाराकडे लक्ष ठेऊन टप्प्या-टप्याने कापसाची विक्री करावी, असा उपयुक्त सल्ला शेती विषयक जुनी जाणकार मंडळी देत आहे. शेतकर्यांनी शक्यतो हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विक्री करू नये. सध्या बाजारात कापसाची आवक उत्तम आहे. भावात आणखी सुधारणा होऊ शकते. दोन-तीन महिन्यात भावात चांगली सुधारणा होण्यास पोषक स्थिती आहे. कापसातील आर्द्रता (ओलावा) कमी झाला आहे, गुणवत्ताही चांगली असून, सीसीआयदेखील कापसाची खरेदी करत आहे. त्यामुळे बाजाराला हमीभावाचा एक आधार निर्माण होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
बाजारातील सध्याचा सरासरी भाव 7 हजारांच्या पुढे दिसतो. सद्यस्थितीत कापसाची सरासरी मात्र भाव 6 हजार 900 ते 7 हजार रुपये होती. छोट्या बाजारांमध्ये कदाचित हा 7 हजारांच्या पुढे भाव व्यापारी दिसून देत नसेल. पण कापसाचा सरासरी भाव आता या पातळीवर पोचला. मागील आठवड्याच्या तुलनेत भाव 500 रुपयांनी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे बाजारातील आवकही वाढत आहे. म्हणजेच आवक वाढत असतानाच कापसाचा भावही वाढत जाणार आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे उत्पादनातील घट होय. सध्या बाजारात कापसाची आवक शिगेला पोहचली असून गाठीची आवक 2 लाखांच्या टप्यात असून कापसाच्या दरातही सुधारणा होत असल्याचे बोलले जात आहे, पण ग्रामीण भागातील शेतकर्यांना हा वाढीव दर मिळताना दिसत नाही. यामागे उत्तम प्रतीच्या कापसाची आवक होत असल्याने यात वाढ होईल याच उद्देशाने शेतकर्यांनी कापूस ठेवला आहे. तर सीसीआय बाजारात कापूस खरेदीत उतरलेले आहे.
मागील आठवड्यापर्यंत कापसात ओलावा अधिक होता. पावसात भिजलेला कापूस होता. त्यामुळे गुणवत्ता कमी होती, हा कापूस सीसीआयने खरेदी केला नाही. पण आता जवळपास साठवून ठेवलेला कापूस पूर्णपणे वाळलेल्या अवस्थेत आहे, त्यातील ओलावा निघून गेला आहे. त्यामुळे आता शेतकर्यांकडे चांगल्या दर्जाचा कापूस उपलब्ध आहे. चांगल्या भावाची अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. सोयाबीन दर गेल्या तीन-चार वर्षांपासून जागेवर आहे. बियाणाच्या दरात वाढ, सोंगणी खर्चात वाढ, मळणी व महागडे कीटकनाशके व पोषक औषधात वाढ, तेलात वाढ, सरकी पेंड मध्ये वाढ मग सोयाबीन दारात वाढ का नाही? हा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना पडला आहे. त्यात शासन खरेदी सुरू होऊन दोन महिने झाले, त्यात शेतकर्यांना सोयाबीन पिकाला हमीभाव मिळणार आहे. पण ऑनलाईन अर्ज भरून अनेक शेतकर्यांना एक ते दीड महिना झाला. त्यामध्ये अजून शेतकर्यांना तुमचे सोयाबीन घेऊन या असा संदेश प्राप्त झालेला नाही. आजतगायत शेतकर्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
दरवाढीसाठी वातावरण चांगले
यंदा कापसाचे उत्पादन सरासरी पेक्षा कमी झाले आहे. याबाबत येत्या काही दिवसात निश्चितपणे सांगता येईल. तर कापूस आयात करण्याची वेळ सध्या आली आहे. परिणामी आयात वाढल्यास आंतरराष्ट्रीय दरवाढ शक्यता आहे. त्यात बाजारातीलही परिस्थिती लक्षात घेता उत्पादकांनी विक्रीचे योग्य नियोजन करणे गरजे आहे. आगामी काळात कापसाच्या दरातही सुधारणा होण्यास पोषक वातावरण असून त्या अनुषंगाने विक्री करावी, अशी जुनी जाणकार मंडळी बोलताना दिसून येत आहे.