नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) नियोजनाची धावपळ सुरू असतानाच, काही संशयितांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालयालाच लक्ष्य केले आहे. मेळ्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे कंत्राट मिळाल्याचे भासवून सरकारची फसवणूक (Fraud) करण्याचा प्रकार विभागीय आयुक्त कार्यालयाने (Divisional Commissioner’s Office) उधळून लावला आहे. ही घटना २८ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली.
नीलकंठ शेवाळे नावाची व्यक्ती विभागीय आयुक्त कार्यालयात काही कागदपत्रे (Document) घेऊन आली होती. ही कागदपत्रे म्हणजे सिंहस्थ (Simhastha) २०२७ साठीची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे कार्यादेश होते. संशय आल्याने हे आदेश कुंभमेळा प्राधिकरण शाखेचे सहाय्यक संशोधन अधिकारी योगेश सोमवंशी यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आले. तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना पत्रातील मजकूर आणि टायपिंगमध्ये विसंगती आढळली. मात्र, सर्वात मोठा पुरावा डिजिटल स्वाक्षरीमध्ये दडला होता.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांच्या अधिकृत स्वाक्षरीत त्यांच्या नावाचे स्पेलिंग प्रविण असे आहे. बनावट पत्रावर मात्र प्रवीण असे चुकीचे स्पेलिंग असलेली बनावट स्वाक्षरी वापरली. ३५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पावर आयुक्तांची स्वाक्षरी बनावट असल्याचे स्पष्ट होताच प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. नीलकंठ शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कार्यादेश त्यांना गजानन पाटील चव्हाण या व्यक्तीने दिले होते. हे आदेश इनोव्हेटीव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्युशन्स या खाजगी एजन्सीच्या नावाने तयार करण्यात आले होते. प्रशासनाची रीतसर निविदा प्रक्रिया न राबवता, थेट आयुक्तांच्या नावे हे बोगस पत्र तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
स्वीय सहाय्यकांची फिर्याद
विभागीय आयुक्तांचे स्वीय सहाय्यक विजय सोनवणे यांच्या तक्रारीनंतर नाशिक रोड पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने हजारो कोटींच्या निधीची तरतूद केली जाणार आहे. अशा वेळी बनावट कार्यादेश काढून कंत्राटदारांना किंवा शासनाला लुटणारी मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




