Sunday, May 5, 2024
Homeनाशिकबळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीत

बळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीत

शिरवाडे वणी | प्रतिनिधी

परिसरात थंडीची चाहूल लागल्याने रब्बी हंगामाची लगबग मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, उन्हाळी मका, उन्हाळ बाजरी या पिकांची पेरणी करण्यासाठी बियाण्यांची शोधाशोध करावी लागत आहे. यंदा पाण्याचे प्रमाण कमी अधिक असल्यामुळे कंपन्यांकडून बाजारामध्ये कमी पाण्यात येणारे बी बियाणे उपलब्ध केले जात आहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारे बियाणे खरेदीसाठी शेतकरी वर्गाची दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

गहू पिकाला वाढता भाव बघता यावर्षी गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर मका क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात चढउतार होण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी वर्गाने उन्हाळ बाजरी देखील करण्यासाठी कंबर कसली आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पावसाने हुलकावण्या दिल्यामुळे तसेच जमिनीची भूक न भागल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन व मका पिकाची वाट लागली असून उत्पादनात लक्षणीय घट झाल्याची पहावयास मिळत आहे.

खरीप हंगामातील प्रमुख नगदी पिक मानल्या जाणार्‍या टोमॅटो पिकाचे विक्रमी म्हणजे चार पटीने उत्पादन वाढल्याचा परिणाम उत्पादकांना लाखाच्या पटीत तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी भांडवलाची उपलब्धता होत नसून कृषी विभागाकडून गहू, हरभरा, बाजरी, मका इत्यादी बियाणे शेतकरी वर्गाला उपलब्ध करून देणे बहुदा सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

ठीकठिकाणी आताही विहिरींना पिण्यापुरतेच पाणी असल्यामुळे अजून देखील दिवाळीपर्यंत पावसाचे वेध लागले आहेत. खरीप हंगामात मका, सोयाबीनचे पीक जोमाने आले होते. परंतु कमी अधिक पावसामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाल्यामुळे या पिकांवर अनेक संकटांची टांगती तलवार निर्माण झाली होती. कांद्याचा आगर असलेल्या बहुतांशी भागात पावसाचे प्रमाण अति अल्प झाल्यामुळे फक्त पिण्यायोग्य पाणी असल्यामुळे तेथील भागात कांदा पिकाचे नियोजन कोलमडून गेले आहे.

तसेच सद्यस्थितीत कांद्याला योग्य भाव मिळत असल्यामुळे येथील परिसरामध्ये लाल व उन्हाळ कांद्यावर जादा प्रमाणात भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. गहू व कांद्याचे विक्रमी उत्पादन होणार असल्याची दाट शक्यता असून ‘कोण बनेगा करोडपती’ अशी स्थिती निर्माण होणार आहे.

सद्यस्थितीत बाजारामध्ये कांदा व गहू कमी प्रमाणात असल्यामुळे भाव मिळत असून शेतकरी वर्गाने त्यावर अवलंबून न राहता नियोजन ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा टोमॅटो सारखी स्थिती निर्माण होऊन ‘तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे’ असा प्रसंग निर्माण होणार नाही व एकाच पिकाकडे न वळता वेगवेगळ्या पिकांची लागवड करणे याची दक्षता देखील वारंवार परिपूर्ण घेणे काळाची गरज आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या