Wednesday, May 15, 2024
Homeमुख्य बातम्याव्यापार्‍याचा मोबाईल 'नॉट रिचेबल'; शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

व्यापार्‍याचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’; शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील पांढुर्ली येथील बाजार समितीच्या उपबाजारात ( Pandhurli Sub APMC )टोमॅटो ( Tomato )खरेदीसाठी आलेल्या दिल्लीच्या व्यापार्‍याने परिसरातील शेतकर्‍यांना 50 लाखांचा गंडा घालून पळ काढण्याची चर्चा होत आहे. आठ दिवसांपासून हा व्यापारी दिसला नसून त्याने दिलेल्या पावत्या घेऊन पैसे आणायला नेमके कुणाकडे जायचे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. या व्यापार्‍याचा भागीदार बनलेला बेलुचा स्थानिक व्यापारीही चार-पाच दिवसांपासून व्यापार्‍याला शोधण्याच्या नावाखाली मुंबईला जाऊन बसला असून बाजार समितीने शेतकर्‍यांचे त्यांच्या हक्काचे, घामाचे पैसे मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

- Advertisement -

सिन्नर बाजार समितीच्या पांढूर्ली उपबाजारात टोमॅटोचे लिलाव होतात. उपबाजाराच्या बाजूलाच असणार्‍या दुसर्‍या व्यापार्‍याच्या गाळ्यात ऑफिस थाटत दिल्लीच्या एका व्यापार्‍याने बाजार समितीसह शेतकर्‍यांनाही उल्लू बनवले आहे. दिल्लीहून आलेल्या या व्यापार्‍याने विनय ट्रेडींग कंपनी नावाने आपली कंपनी असल्याचे सांगत याच कंपनीच्या नावावर शेतकर्‍यांकडून टोमॅटोची खरेदी केली.

शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने बेलूचाच एक स्थानिक व्यापारी भागीदार म्हणून घेतला. याच भागीदाराच्या भरवशावर साध्या कागदावर लिहून दिल्यानंतरही शेतकर्‍यांनी आपले टोमॅटो या व्यापार्‍याला विकले. दिवाळीच्या काळात टोमॅटोच्या क्रेटला सहाशे ते सातशे रुपयांचा भाव मिळत होता. तेव्हा या व्यापार्‍याने शेतकर्‍यांकडून उधारीत टोमॅटो खरेदी करत ट्रक, दोन ट्रक टोमॅटो दररोज याच उपबाजारातून दिल्लीला रवाना केले.

त्यावेळी दहा-बारा दिवसात पैसे देण्याचा शब्द त्याने दिला होता. पैसे मिळण्याचा दिवस जवळ आल्यानंतर पाच तारखेपासून हा व्यापारी उपबाजारात फिरकला नसून त्याचा मोबाईलही नॉट रीचेबल झाला आहे. बेलूचा स्थानिक व्यापारीही या व्यापार्‍याला शोधण्याच्या बहाण्याने मुंबईला गेला असून लाखो रुपयांचा शेतमाल विकल्यानंतरही पैशासाठी वणवण फिरण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

साध्या कागदावर लाखोंचा व्यवहार

या व्यापार्‍याने दिलेल्या चिठ्ठीवर त्याच्या कंपनीचे नाव विनय ट्रेेडिंग कंपनी असून विनय सिंग असे त्याचे नाव आहे. त्यावर त्याचा मोबाईल नंबरही छापला आहे. या चिठ्ठीवर शेतकर्‍याच्या मालाचे वर्णन व रक्कम पेनने लिहिली असून पेमेंट देण्याची तारीख लिहून खाली सही केली आहे. बेलुतील शेतकर्‍यांचे 35 लाख तर विंचूरदळवी येथील शेतकर्‍यांचे 15 लाख व विंचूर दळवीच्या शेतकर्‍यांचेही काही लाख या शेतकर्‍यांकडे अडकल्याची चर्चा आहे.

व्यापारी परवानाधारक नाही

शेतकर्‍यांची बाहेरच्या व्यापर्‍याकडून फसवणूक झाल्याची घटना कानावर आली आहे. मात्र, हा व्यापारी बाजार समितीचा परवानाधारक नाही. त्याने परस्पर शिवार खरेदी केली आहे. बाजार समितीत शेतमाल विकल्यानंतर शेतकर्‍यांना 24 तासांच्या आत रोख पैसे मिळतात. तसे सर्व उपबाजारात आपण ध्वनीक्षेपकावरुन दररोज सांगत असतो. तरीही शेतकर्‍यांनी व्यापार्‍यावर विश्वास ठेवला. त्यामूळे त्यांची फसवणूक झाली आहे.

विजय विखे, सचिव, सिन्नर बाजार समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या