Thursday, May 2, 2024
Homeनगरशेतजमिनीच्या वादातून हाणामारी; 9 जणांवर गुन्हा दाखल

शेतजमिनीच्या वादातून हाणामारी; 9 जणांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

शेतजमिनीच्या वादातून नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे हाणामारीची घटना घडली. यात दोन्ही बाजूचे 9 जण जखमी झाले असून नेवासा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरुन दोन्ही बाजूच्या 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत मच्छिंद्र यमाजी आचपळे (वय 65) धंदा-शेती, रा. पाचुंदा ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी वरील ठिकाणी माझी बायको, मुलगा असे एकत्रीत राहावयास आहे. माझी पाचुंदा शिवारात शेती गट नं17/5 आहे. माझे शेती लगतच नवनाथ दौलत आचपळे याची शेती असून आमचे शेतीचे कारणावरून नेहमी वाद होत असतात. दि. 28 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नवनाथ दौलत आचपळे हा त्याच्या शेतातील घराचे बांधकाम करीत होता. त्यामुळे मी त्यास म्हणालो की, आपले जमिनीचे वाद कोर्टात चालू आहे.

जोपर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत तू बांधकाम करू नको. असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने त्याने त्याचे घरातील लोकांना बोलावून घेतले. त्यावेळी घरातून गौरक्षनाथ दौलत आचपळे, हरिभाऊ गोरक्षनाथ आचपळे, हनुमंत नवनाथ आचपळे, व इतर दोन महिला असे नवनाथ आचपळे बरोबर हातात काठी व वायररोप घेवून माझे जवळ आले “तू आमचे बांधकाम कसे थांबवू शकतो?’ असे म्हणून त्या सर्वांनी मला लाकडी काठी व वायररोपने तसेच लाथाबुक्क्यांनी करण्यास सुरूवात केली.

माझा डोळ्याजवळ लाकडी दांड्याने मारहाण केल्यामुळे मोठी जखम झाल्याने त्यातून रक्त येऊ लागल्याने मी मोठमोठ्याने आरडा ओरड करू लागलो. माझा आवाज ऐकूण माझी बायको व मुलगा मला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी धावत माझेजवळ आले. त्यावेळी वरील सर्वांनी त्यांनादेखील मारहाण करून शिवीगाळ करून तू जर आम्हाला परत आडवा आला तर तुम्हाला तिघांनाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गु.र.नंबर 268/2021 भारतीय दंड विधान कलम 324, 325, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी फिर्याद नवनाथ दौलत आचपळे (वय 42) धंदा-शेती, रा.पाचुंदा यांनी दिली असून त्यात म्हटले की, पाचुंदा शिवारात शेती गट नं 17/5 मध्ये माझी शेती आहे. या शेतीलगतच मच्छिंद्र यमाजी आचपळे यांची शेती असून आमचेत शेतीचे कारणावरून नेहमी वाद होत असतात. दि.28 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मच्छिंद्र यमाजी आचपळे हा तेथे आला व मला म्हणाला की, “तू येथे घर बांधू नको.” त्यावर मी त्याला समजून सांगत असताना “तुम्ही येथे घर कसे बांधता मी पाहतोच” असे म्हणून त्याने त्याचा मुलगा व पत्नी यांना आरोळी देवुन बोलावून घेतले व ते माझे जवळ आल्यानंतर त्याचे मुलाने जवळच पडलेला लाकडी दांडा उचलून माझ्या कंबरेवर मारला.

त्यावेळी मी मोठ्याने ओरडलो. माझा ओरडण्याचा आवाज ऐकून माझे घरातून भावजई, भाऊ गोरक्षनाथ व आई असे पळत माझे जवळ आले. त्यावेळी योगेश याने त्याच्या होतातील लाकडी दांडा भाऊ गोरक्षनाथ याच्या छातीवर जोरात मारला. त्यावेळी गोरक्षनाथ हा छातीला जबर मार लागल्याने जागीच खाली पडला. त्याला सोडवण्यासाठी मी व माझी भावजाई व आई असे आम्ही तिघे मिळून मधे पडलो. त्यावेळी मच्छिंद्र आचपळे व त्याची बायको यांनी आम्हाला चौघांनाही लाथा-बुक्याने मारहाण करून घाणघाण शिवीगाळ करून योगेश आचपळे हा आम्हास म्हणाला की तुम्ही याठिकाणी जर घर बांधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला चौघांनाही जीवे मारून टाकीन असे म्हणून ते तेथून निघून गेले. या फिर्यादी वरून वरील तीन जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नंबर 269/2021 भादवी कलम 324, 325, 323,504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या