पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
रामतीर्थ परिसरातील गांधी ज्योतखालील राम मंदिराजवळ अडकलेल्या बावन्न वर्षीय व्यक्तीला अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुखरूप बाहेर काढण्यात आले. वेळोवेळी अशा दुर्घटनांमध्ये जीव धोक्यात आलेल्या नागरिकांना वाचविण्याचे कार्य सातत्याने करणाऱ्या दलाच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
श्रावण महिन्यातील पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून गोदाघाट परिसरात पाणीपातळी वाढली आहे. या निसर्गसौंदर्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येतात. मंगळवार (ता. २६) रोजी जळगाव येथील ५२ वर्षीय ज्ञानेश्वर पाटील हे रामतीर्थावर आले होते. दर्शनानंतर ते गांधी ज्योतखालील मंदिर परिसरात थांबले असता अचानक पाणीपातळी वाढल्याने ते अडकून पडले.
ही माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर केंद्राच्या बंब क्र. ३३०९ सह अधिकारी व जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लाईफ रिंग व दोराच्या साहाय्याने पाटील यांना सुरक्षित बाहेर काढले. या मोहिमेत प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे, वाहनचालक ए. बी. सरोदे, लीडिंग फायरमन एस. डी. जाधव, डी. पी. पाटील, बाळासाहेब लहांगे, तसेच ट्रेनी फायरमन नीलकंठ शिंदे, प्रथमेश उगले व आशुतोष पगारे यांनी सहभाग नोंदवला.
आवाहन
नाशिक शहर व गंगापूर धरण परिसरात सतत पाऊस सुरू असल्याने वेळोवेळी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे रामतीर्थ व गोदाघाट परिसरात पाणीपातळी वाढत आहे. अशा स्थितीत भाविक व पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी पाण्यात जाणे टाळावे, तसेच लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी संजय कानडे यांनी केले आहे.




