नाशिक | Nashik
मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वगळून केलेल्या भाषणावर वनरक्षक कर्मचारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांच्याशी साधला संवाद
नाशिकमधील वनरक्षक माधवी जाधव यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी माधवी जाधव यांना धीर देत, या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
माधवी जाधव यांनी घडलेला संपूर्ण घटनाक्रम ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मांडला. गिरीश महाजन यांच्या वागणुकीतून त्यांची ‘नीच मानसिकता’ दिसून येते असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले “हे कृत्य केवळ अपमानजनक नसून अट्रॉसिटी कायद्यांतर्गत (SC/ST Act) गुन्हा ठरणारे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक पश्चिम कमिटीकडून यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, जर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, तर स्वतः प्रकाश आंबेडकर या प्रकरणाचा कायदेशीर ड्राफ्ट तयार करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडतील. आरएसएस आणि भाजपकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बहुजन समाजातील व्यक्तींचा अवमान केला जात आहे,” असा म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध केला आहे.
नेमका प्रकार काय होता?
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदानातील कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख राहून गेला. या भाषणावरून वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने माधवी जाधव यांना पाठिंबा दिलाय.




