अहिल्यानगर (प्रतिनिधी)
दिवाळीनंतर होणार असलेल्या जिल्हा परिषदेच्या ७५ गट आणि पंचायत समितीच्या १५० गणांची अंतिम प्रभाग रचना नकाशासह शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जाहीर केली आहे. गेल्या महिन्यांत जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल हरकती आणि सुचनांवर सुनावणी होवून जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांची हद्द निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रारूप प्रभाग रचना अंतिम करताना कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील गटातील आणि पंचायत समितीच्या गणातील काही गावांची अदला बदल करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता प्रभाग रचना अंतिम झाल्याने निवडणुकीसाठी प्रभाग रचनेच्या धर्तीवर आरक्षण सोडती काढण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी आधी प्रभाग रचना त्यानंतर आरक्षण, त्यानंतर निवडणूक कार्यक्रम अशी प्रक्रिया राहणार आहे.
गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार १४ जुलैला जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. या प्रारूप प्रभाग रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान, मागील महिन्यांत दाखल करण्यात आलेल्या जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रारूप प्रभाग रचना ही २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार असल्याचे दिसून आले. यात केवळ कर्जत आणि जामखेड तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढलेले आहेत. २०१७ नूसार २०२५ च्या गट आणि गणांची प्रभाग रचना दिसत असली तरी २०१७ नुसार गट आणि गणांची राजकीय आरक्षण राहणार की त्यात बदल होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
३६ लाख ४ हजार ६६८ लोकसंख्या
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली असून त्यानुसार ७५ गटांमध्ये ३६ लाख ४ हजार ६६८ लोकसंख्या असून त्यात अनुसूचित जातीची ४ लाख ४५ हजार ५९५ तर अनुसूचित जमातीची ३ लाख ५७हजार ४१३ लोकसंख्या आहे.
सर्वाधिक लोकसंख्या भातकुडगाव गटाची
२०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर गट व गणांची प्रभाग रचना करण्यात आली असून सर्वाधिक लोकसंख्या शेव-गाव तालुक्यातील भातकुडगाव गटाची ५६ हजार १०६ तर सर्वात कमी लोकसंख्या जामखेड तालुक्यातील साकत गटाची ३६ हजार २९८ आहे. जिल्हा परिषदेच्या ७५ गटापैकी २२ गटांमधील लोकसंख्या ही ५० हजारांच्या पुढे आहे. तर उर्वरित गटामध्ये लोकसंख्या ही ४० ते ४९ हजार दरम्यान आहे.
निवडणुकीची तयारी मजल दरमजल
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी टप्प्याने तयारी सुरू असून मागील महिन्यांत मतदान यंत्रांची प्रथम तपासणी झालेली असून आता प्रभाग रचना देखील अंतिम करण्यात आलेली आहे. आता निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त, वाढीव मतदान यंत्रांची मागणी यासह मतदान प्रक्रियेतील यंत्रणेला प्रशिक्षण आदी कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासन तथा ग्रामपंचायत विभाग यांच्यावतीने सांगण्यात आले.
२३ हरकती मान्य
प्रारूप प्रभाग रचनेवर अनेकांनी घेतलेल्या हरकतीमध्ये काहींच्या हरकती ग्राह्य धरत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही तालुक्यात गट-गणांची मोडतोड करण्यात आली आहे. यामुळे काही तालुक्यात इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. झेडपीच्या गटांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या ९२ हरकतींवर सुनावणी होवून यातील जामखेड, पारनेर, कोपरगाव, श्रीगोंद्यातील २३ हरकती मान्य करण्यात आल्या होत्या. तर ६९ हरकती फेटाळण्यात आल्या असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
२०१७ मधील आरक्षण असे होते
अकोले- समशेरपुर सर्वसाधारण महिला, देवठाण सर्वसाधारण, धामणगाव आवारी सर्वसाधारण, राजूर सर्वसाधारण, सातेवाडी सर्वसाधारण, कोतूळ सर्वसाधारण. संगमनेर समनापुर सर्वसाधारण, वडगाव पान सर्वसाधारण, आश्वी बु. सर्वसाधारण महिला, जोर्वे अनुसूचित जमाती महिला, घुलेवाडी सर्वसाधारण, धांदळफळ ओबीसी, संगमनेर खुर्द ओबीसी, बोटा ओबीसी, साकुर सर्वसाधारण. कोपरगाव सुरेगाव सर्वसाधारण, ब्राह्मणगाव सर्वसाधारण महिला, वारी अनुसूचित जाती महिला, शिंगणापूर सर्वसाधारण, चांदेकसारेओबीसी महिला. राहाता – पुणतांबा अनुसूचित जमाती, वाकडी ओबीसी महिला, साकुरी सर्वसाधारण महिला, लोणी खू. ओबीसी महिला, कोल्हार बु. अनुसूचित जमाती. श्रीरामपूर – उंदीरगाव अनुसूचित जमाती महिला, टाकळीभान अनुसूचित जमाती महिला, दत्तनगर सर्वसाधारण महिला, बेलापूर सर्वसाधारण. नेवासा बेलपिंपळगाव सर्वसाधारण, कुकाणे ओबीसी महिला, भेंडा ओबीसी, भानसहिवरे अनुसूचित जाती महिला, खरवंडी ओबीसी, सोनई अनुसूचित जाती महिला, चांदा ओबीसी महिला. शेवगाव- दहिगाव-ने सर्वसाधारण महिला व देव-गाव अनुसूचित जाती महिला, लाडजळगाव सर्वसाधारण, भातकुडगाव अनुसूचित जाती. पाथर्डी-कासार पिंपळगाव सर्वसाधारण, भालगाव सर्वसाधारण, माळी बाभुळगाव ओबीसी महिला, मिरी ओबीसी, टाकळीमानुर ओबीसी महिला. देहेरे ओबीसी, जेऊर ओबीसी महिला, नागरदेवळे सर्वसाधारण, दरेवाडी ओबीसी, निंबळक सर्वसाधारण, वाळकी सर्वसाधारण महिला. राहुरी – टाकळीमिया अनुसूचित जमाती महिला, ब्राह्मणी अनुसूचित जमाती, सात्रळ सर्वसाधारण महिला, बारागाव नांदूर ओबीसी वांबोरी सर्वसाधारण महिला. पार-नेर – ढवळपुरी सर्वसाधारण महिला, कान्हूर पठार सर्वसाधारण महिला, टाकळी ढोकेश्वर ओबीसी, निघोज सर्वसाधारण, सुपा सर्वसाधारण महिला. श्रीगोंदा येळपणे ओबीसी महिला, कोळगाव सर्वसाधारण महिला, मांडवगण सर्वसाधारण महिला, आढळगाव सर्वसाधारण महिला, बेलवंडी सर्वसाधारण महिला, काष्टी सर्वसाधारण. कर्जत मिरजगाव सर्वसाधारण, कोरेरेगाव ओबीसी महिला, कुलधरण अनुसूचित जाती, राशीन अनुसूचित जाती. जामखेड खर्डा अनुसूचित जाती महिला आणि जवळा अनुसूचित जाती असे आरक्षण होते.
आरक्षण सोडत कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्याची शक्यता; इच्छुकांचा जीव टांगणीला, आरक्षणाकडे जिल्ह्याचे लक्ष
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी येत्या सोमबार (दि.२५) रोजी आरक्षण कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्हा प्रशासन जिल्हा परिषदेच्या ७५ गट आणि पंचायत समितीच्या १५० गणांचे प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात येणार असून या प्रारूप आरक्षणावर हरकती आणि सुनावणी होवून त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने आरक्षण अंतिम होणार आहे.
यासाठी प्रभाग रचनेनूसार स्वतंत्र कार्यक्रम राहणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २०१७ मध्ये निवडणूक झाल्या होत्या. त्याची मुदत २०२२ मध्ये संपल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने वाढीव ओबीसी आरक्षणानूसार गट आणि गणांचे आरक्षण जाहीर केले होते. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे वाढीव आरक्षण रद्द करत २०१७ च्या २७ टक्के ओबीसी आरक्षणानूसार निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानूसार आता राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्हा प्रशासन गट आणि गणांची राजकीय आरक्षण जाहीर करणार आहेत. दरम्यान, यंदा जिल्ह्यात कर्जत आणि जामखेड तालुक्यात प्रत्येकी एक यानूसार जिल्हा परिषदेचे दोन आणि पंचायत समितीचे चार गण वाढलेले असून याचा परिणाम जिल्हा आरक्षणावर होण्याची शक्यता आहे. एकाचा खो दुसऱ्याला बसल्याने जिल्ह्यातील सर्व गटातील आरक्षण बदलण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्रारूप आरक्षण जाहीर झाल्यावरच प्रत्येक गटातील राजकीय परिस्थितीचा अंदाज येणार आहे. तोपर्यंत इच्छुकांकडून आराखडे बांधण्यास सुरूवात झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद गटाचे आरक्षण काय निघणार, आपला हक्काचा गट खुला राहणार की आरक्षीत होणार? त्यातही सर्वसाधारण की महिलेसाठी राहणार याकडे जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष राहणार आहे.





