मुंबई । Mumbai
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सध्या विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केलेल्या एका फोनमुळे या निवडणुकीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून या निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे असलेले जुने कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध पाहता, उद्धव ठाकरे यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. शिवसेनेकडून (यूबीटी) सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात असून, उद्धव ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, महाविकास आघाडीमध्ये या जागेवरून पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपला स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी आणि रासपला सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे काँग्रेसच्या उमेदवाराला साथ देणार की कौटुंबिक संबंधांना प्राधान्य देत सुनेत्रा पवारांच्या पारड्यात आपले वजन टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने उमेदवार दिला तरी ठाकरे गट सुनेत्रा पवारांनाच पाठिंबा देण्यावर ठाम राहू शकतो.
दुसरीकडे, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र चित्र वेगळे दिसण्याची शक्यता आहे. राहुरीमध्ये उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित चर्चा करून निर्णय घेणार आहेत. या जागेसाठी महाविकास आघाडी सकारात्मक असून तिथे निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. बारामतीमध्ये ठाकरे गट सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असेल, तर त्याचे पडसाद राहुरीच्या राजकारणात उमटू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दोन्ही ठिकाणची समीकरणे जुळवून घेताना विचारपूर्वक पाऊल टाकावे लागणार आहे.
बारामतीची ही पोटनिवडणूक केवळ राजकीय नसून ती भावनिकही मानली जात आहे. अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आणि त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने, ती बिनविरोध व्हावी अशी इच्छा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे. आता काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम राहते की महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेद पाहायला मिळतात, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.





