नाशिक | Nashik
काल देशातील आठ राज्यांतील ९४ लोकसभेच्या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. त्यामध्ये जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा (Nashik and Dindori) मतदारसंघासाठी देखील मतदान (Voting) प्रक्रिया पार पडली. सकाळी सात वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत या दोन्ही मतदारसंघांतील विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी नेमके किती टक्के मतदान झाले याची अधिकृत टक्केवारी समजू शकलेली नव्हती. त्यानंतर अखेर आज या दोन्ही मतदारांसंघातील विधानसभानिहाय (Assembly Wise) एकूण मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.
हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक लोकसभेसाठी ५१.१६ तर दिंडोरीसाठी ५७.०६ टक्के मतदान
या आकडेवारीनुसार नाशिक लोकसभेसाठी (Nashik Loksabha) ६०.७५ तर दिंडोरीसाठी ६६.७५ टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये नाशिक लोकसभेतील २० लाख ३० हजार १२४ मतदानापैकी १२ लाख ३३ हजार ३८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यात ६ लाख ७२ हजार ५७५ पुरुष तर ५ लाख ६० हजार ७७० महिलांनी मतदान केले. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विधानसभानिहाय मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास सिन्नर विधानसभा मतदारसंघात ६९.५० टक्के इतके मतदान झाले असून येथील एकूण ३ लाख ६ हजार ५३३ मतदारांपैकी २ लाख १३ हजार ४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७२.२४ टक्के इतके मतदान झाले असून या मतदारसंघातील एकूण २ लाख ७४ हजार ५४ मतदारांपैकी १ लाख ९७ हजार ९७५ मतदारांनी मतदान केले आहे.
हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिकसाठी ३९.४१ तर दिंडोरी लोकसभेसाठी ४५.९५ टक्के मतदान
त्याबरोबरच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ५४.३५ टक्के मतदान झाले असून येथील एकूण ४ लाख ५६ हजार ९६ मतदारांपैकी २ लाख ४७ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात ५५.३८ टक्के इतके मतदान झाले असून या मतदारसंघातील एकूण ३ लाख ८८ हजार ४८५ मतदारांपैकी २ लाख १५ हजार १५२ मतदारांनी मतदान केले आहे. याशिवाय नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात ५७.१५ टक्के इतके मतदान झाले असून येथील एकूण ३ लाख २८ हजार ५४ मतदारांपैकी १ लाख ८७ हजार ४९१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर देवळाली विधानसभा मतदारसंघात ६२.०५ टक्के इतके मतदान झाले असून या मतदारसंघातील एकूण २ लाख ७६ हजार ९०२ मतदारांपैकी १ लाख ७१ हजार ८२४ मतदारांनी मतदान केले आहे.
हे देखील वाचा : HSC Result : राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ तर नाशिक विभागाचा ९४.७१ टक्के
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आकडेवारी
दिंडोरी लोकसभेसाठी (Dindori Loksabha) ६६.७५ टक्के इतके मतदान झाले असून या मतदारसंघातील १८ लाख ५३ हजार ३८७ मतदानापैकी १२ लाख ३७ हजार १८० मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये ६ लाख ७९ हजार ३९९ पुरुष तर ५ लाख ५७ हजार ७७७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विधानसभानिहाय मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास नांदगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ५८.२४ टक्के मतदान झाले असून येथील एकूण ३ लाख ३२ हजार ५१२ मतदारांपैकी १ लाख ९३ हजार ६५७ मतदारांनी मतदान केले आहे. तर कळवण विधानसभा मतदारसंघात ७०.८९ टक्के इतके मतदान झाले असून या मतदारसंघातील एकूण २ लाख ९४ हजार ३ मतदारांपैकी २ लाख ८ हजार ४२० मतदारांनी मतदान केले आहे.
तसेच चांदवड विधानसभा मतदारसंघात ६६.६५ टक्के मतदान झाले असून या मतदारसंघातील एकूण २ लाख ९९ हजार ३०४ मतदारांपैकी १ लाख ९९ हजार ४९७ मतदारांनी मतदान केले आहे. याशिवाय येवला विधानसभा मतदारसंघात ६५.३८ टक्के मतदान झाले असून येथील एकूण ३ लाख १४ हजार ५५१ मतदारांपैकी २ लाख ५ हजार ६६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर निफाड विधानसभा मतदारसंघात ६४.३१ टक्के मतदान झाले असून या मतदारसंघातील एकूण २ लाख ९१ हजार ४५९ मतदानापैकी १ लाख ८७ हजार ४२५ मतदारांनी मतदान केले आहे. याशिवाय दिंडोरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७५.४२ टक्के मतदान झाले असून येथील एकूण ३ लाख २१ हजार ५५८ मतदानापैकी २ लाख ४२ हजार ५१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.