मुंबई | Mumbai
लातूरमध्ये काल (२० जुलै) रोजी झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे. छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी त्यांची भेट घेऊन लवकरच गैरसमज दूर करू अशी प्रतिक्रिया सूरज चव्हाण यांनी दिली. या मारहाणीचा सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर या वादावर सूरज चव्हाण यांनी जाहीर माफी मागत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. घडलेला प्रकार दुर्देवी असून तो घडायला नको होता असे सांगून त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे.
सोमवारी(२१ जुलै) सकाळी सूरज चव्हाण यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत माफी मागितली. त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांवर अशा बातम्या चालू आहेत की, शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटील यांना आम्ही मारहाण केली. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. कोणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला, तर त्याच्या पाठीशी उभे राहणे मी माझे कर्तव्य समजतो. परंतु, असंवैधानिक शब्द वापरला, आमच्या नेतृत्त्वाबद्दल म्हणून आमच्याकडून तशीही कृती झाली. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करेन, असे सूरज चव्हाण यांनी म्हटले.
यासोबतच त्यांनी सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हंटले आहे की, महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता. छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता. परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी पत्ते उधळत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विजय घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या २-३ कार्यकर्त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सूरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांना कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




