अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी येथे आज (दि. 6) होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला दुपारी साडेबारा वाजता सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळ बैठक दीड तास चालणार असून यासाठी खास जर्मन हँगर प्रकारचा मंडप उभारण्यात आला. दरम्यान, नगर जिल्ह्यात पहिल्यांदा होणार्या या बैठकीकडे राज्याचे लक्ष राहणार असून नगरसह राज्याला महायुती सरकार काय नवीन देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, विविध विभागांचे सचिव, आमदार यांच्यासाठी या ठिकाणी वातानुकूलित भव्य मंडपासह विविध कक्ष उभारण्यात आहेत. तसेच साडेतीन हजार खुर्च्याची व्यवस्था केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक ग्रामीण भागात चौंडीमध्ये होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ला संवर्धन, पेडगाव किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक, तसेच जिल्ह्याच्या औद्योगिक विकास आराखड्याला मोठा निधी मिळण्याची शक्यता आहे.
यासह राज्य सरकार अहिल्यादेवींच्या भूमीतून कोणती नवीन घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीसाठी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जोरदार नियोजन सुरू असून राज्यातील बड्या अधिकार्यांसह जिल्हा प्रशासनाची यासाठी धावपळ सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात होणारी ही बैठक यशस्वी करण्यासाठी अधिकार्यांच्या डोक्याला घाम आलेला दिसत आहे.
नगरी भोजनाचा पाहुणचार
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, सचिव यांच्यासह 600 व्हीव्हीआयपीसह 2 हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था बचत गटातील महिलांकडे देण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले 15-20 विविध पदार्थ बनवले जाणार आहेत. त्यात शिपी आमटी, आमरस, शेंगोळे, थालीपीठ, वांग्याचे भरीत, डाळबट्टी, दही धपाटे आदी पदार्थांचा समावेश असून मंत्री, आमदार आणि सचिवासांठी चांगलीच मेजवानी ठरणार आहे. या ठिकाणी सुरूची जेवणासह आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या असून आरोग्य विभागाचे पथक तैनात राहणार आहे.
प्रत्येक मंत्र्यांसाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी
मंत्रिमंडळाच्या या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वतंत्र संपर्क अधिकारी नेमण्यात आले प्रत्येक शासकीय विभागावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांच्यासह अधिकार्यांचे पथक चोंडीत होते. त्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीचे नियोजन अंतिम केले.
दुपारी वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पोहणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दुपारी बारा वाजाता हेलिकॉप्टरने चोंडी येथे आगमन होणार आहे. यासाठी पाच हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. मान्यवरांच्या अगमनानंतर अहिल्यादेवींच्या स्मारकाला अभिवादन करून दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळ बैठकीला प्रारंभ होईल. सुमारे दीड तास ही बैठक चालणार आहे. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होवून मंत्री, आमदार, अधिकारी आणि इतर पाहुण्यांच्या भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर पुढील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री अहिल्यानगर येथे हेलिकॉप्टरने येणार आहेत.
नगरमध्ये भरगच्च कार्यक्रम
चोंडीतील बैठक संपवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी 3.30 वाजता डॉ. विखे पाटील फाउंडेशन विळद येथे आगमन होणार आहे. या ठिकाणी विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या नूतन होस्टलेचे उद्घाटन होणार असून त्यानंतर भाजपच्या नूतन कार्यालयाचे भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर पावणे पाच वाजता मुख्यमंत्री भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून हा कार्यक्रम सहकार सभागृहात होणार आहे. त्यानंतर नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.