Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या"आज मी करणार अन्नत्याग..."; राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या

“आज मी करणार अन्नत्याग…”; राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या

नाशिक | विजय गिते | Nashik

“आज मी करणार अन्नत्याग… सरकारी धोरणाचा बळी ठरलेल्या आत्महत्याग्रस्त (Suicide) शेतकरी (farmers) बांधवाना श्रद्धांजली वाहण्यासाठी… शेतकरी पुत्रांनो आपणही सामील व्हा… एक दिवस उपवास, आपल्या शेतकरी राजाला समर्पित…

- Advertisement -

आत्महत्या (Suicide) केलेल्या शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतकऱयांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी…सोमवारी दि. 19 मार्च रोजी देशभरातील किसानपुत्र आणि पुत्री यांनी दिवसभर उपवास करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा देशाच्या भिन्न राज्यात तसेच जगातील भिन्न देशातही एक दिवस उपवास केला जाणार आहे.

… हाच तो काळादिवस 19 मार्च 1986. ज्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal district) चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने चार मुलं, पत्नीसह आत्महत्या केली. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) म्हणून ती नोंदवली गेली. संपूर्ण राज्य हळहळले. वाटलं होतं इथंच सगळं थांबल. पण पुढे असंख्य शेतकरी आत्महत्या होतच राहिल्या.

राजकीय नेत्यांना भाषणांसाठी फक्त नवं भांडवल मिळालं. पण आजपर्यंत यावर कुठलंही सरकार काहीही करू शकले नाही. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कमी होत चाललाय.. शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकरीच थांबवू शकतात. यासाठी हवी आहे फक्त एकमेकाला साथ. जगणे असहय्य झाल्यामुळे चिलगव्हाणच्या करपे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली. ते संगीताचे जाणकार होते. गावच्या सरपंचपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले होते.

त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे वर्णन केले होते व सरकारने शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर गंभीरपणे उपाय करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे सरकारने लक्ष दिले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सुरू झालेले सत्र आजही थांबले नाही. सुमारे साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. साधारण चाळीस ते पन्नास शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत.

सरकारे बदलली पण शेतकऱ्यांचे हाल थांबले नाहीत. यंदा तर बेरोजगारांच्या म्हणजेच किसानपुत्रांच्या आत्महत्यांचा आकडा पुढे आला आहे. आपल्या मुलाने शिकून शेतीबाहेर पडावे यासाठी शेतकरी आई बापांनी खस्ता खाल्ल्या. पण त्याही क्षेत्रात समस्या निर्माण झाल्या व तरुण मुले आत्महत्या (suicide) करू लागली. शेतकरी मरत आहेत व त्यांची मुलेही आत्महत्या करीत आहेत, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

आपण काय करू शकतो?

आपण सरकार नाही. सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात कायदे बदलण्याचे अधिकार नाहीत. आपल्या हातात शस्रही नाहीत, आपण एक विचार करावा. आपल्या घरात अशी घटना घडली तर आपण काय करतो? किमान एक दिवस आपल्याला घास जाणार नाही. बस हाच विचार 19 मार्चच्या उपवासाच्या मागे आहे.

ज्यांना शक्य असेल ते सामूहिकरित्या एके ठिकाणी बसून उपवास करू शकतात, पण ज्यांना बसणे शक्य होणार नाही, त्यांनी आपापले काम करीत उपवास करावा. हवे तर उपवास सोडण्यासाठी एकत्र जमावे.तेही शक्य नसेल तर सोशल मीडियावर जाहीर करावे. संध्याकाळी बरोबर 5 वाजता दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण करावी ! तुम्ही कोण्या पक्षाचे, संघटनेचे असा, कोणत्याही विचारसरणीचे असा, व्यावसाय किंवा नोकरी करणारे असा, 19 मार्च रोजी एक दिवस उपवास करा ! असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्यावतीने करण्यात आले आहे.

पुन्हा पेरू…!! तेल संपलं वात जळाली समई आहे ना ..पुन्हा पेटवू …! सावरा तोल स्वतः अनमोल आयुष्य आहे ना.. पुन्हा चेतवू…! एक वादळ .. एक खड्डा छाती आहे ना .. अंधार चिरु…! पिकं सडली हंगाम गेला माती आहे ना .. पुन्हा पेरू…!!

– संदीप जगताप,प्रदेशाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या