Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपहिले हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचे निधन

पहिले हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचे निधन

कोल्हापूर

लालमातीत भल्याभल्यांना आस्मान दाखवून पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियनसारख्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून श्रीपती खंचनाळे आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, महिन्याभराच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज सकाळी त्यांची उपचारदम्यान प्राणज्योत मालवली.

श्रीपती खंचनाळे हे भारताचे पहिले हिंदकेसरी होते. १९५९ साली दिल्ली झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खंचनाळे यांनी हिंदकेसरीची पहिली गदा पटकावली होती. अनेक मैदाने गाजवणारा कुस्तीपटू अशी खंचनाळे यांची ओळख होती. हिंदकेसरीपद पटकावल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी मल्लांना आस्मान दाखवले होते. करतार पंजाबी, खडकसिंग, सादिक पंजाबी, मंगलराय, टायगर बच्चनसिंग, नजीर अहमद, मोती पंजाबी, गुलाब कादर यांसारख्या अनेक नावाजलेल्या मल्लांवर त्यांनी मात केली होती.

मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

खंचनाळे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर महाराष्ट्राचे नाव कोरले ते पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि होतकरू कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदकेसरी ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांना वाहिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या