Sunday, May 19, 2024
Homeधुळेभरवस्तीत एटीएम फोडून लांबविले साडेपाच लाख

भरवस्तीत एटीएम फोडून लांबविले साडेपाच लाख

कापडणे । kapdne

येथील टाटा इंडिकॅश कंपनीच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत साडेपाच लाख लांबविले. येथील भवानी मंदिर, या प्रमुख चौकातील हे एटीएम (ATM) फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला. चोरट्यांनी एटीएम मशिनच्या (ATM machine) व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांना स्प्रे मारल्यानंतर चोरी केल्याचे समोर आले आहे. सोनगीर पोलीसांसह वरिष्ठांनी या घटनेची कसुन चौकशी केली असुन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य चौकातील व भर वस्तीत झालेल्या या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

- Advertisement -

कामगार नगर भागात- मुख्य रस्त्याला लागून न्यू आनंद पान सेंटरचे संचालक रतन माळी यांच्या इमारतीमध्ये हे टाटा प्रॉडक्टचे इंडिकॅश एटीएम मशीन (ATM machine) आहे. अनेक वर्षांपासून हे मशीन या ठिकाणी कार्यान्वित असून कापडणे ग्रामस्थांची यामुळे मोठी सोय होते. या एटीएममध्ये दि. 20 रोजी पहाटे धाडसी चोरी झाल्याचे उघडकीस आले.

येथील मुख्य चौकातील टाटा इंडिकॅशचे एटीएम फुटल्याचे निदर्शनास येताच सोनगीर पोलिसांना कळविण्यात आले. या चौकात रात्री 1 वाजेपर्यंत तर पहाटे 5 नंतर वर्दळ सुरु असते, म्हणुन पहाटे अडीच ते चारच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे बोलले जात आहे. गावात पशुधन व वीजपंपाची चोरी तसेच किराणा दुकान, टीव्ही दुकान फोडुन चोरी आदी नित्याचेच झाले आहे, असे असतांना भरवस्तीतील एटीएम फुटण्याच्या या घटनेने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. एटीएम फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर, हे एटीएम हाताळणारे कर्मचार्‍यांनीही तत्काळ भेट दिली. यात टाटा इंडिकॅशचे चॅनेल मॅनेजर हेमंत पवार, अभियंता अनिल चौधरी, शाम साळवे, कैलास गाडेकर यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे साडेपाच लाख कॅश असल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे एपीआय चंद्रकांत पाटील, पीएसआय विजय चोखे, एएसआय अजय सोनवणे, श्री.वानखेडे, संजय जाधव, सुरेश साळवे, प्रविण सोनवणे, अजय सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. तसेच एसडीपीओ ईश्वर कातकाडे, एलसीबीचे पीआय हेमंत पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत चौकशी केली. यानंतर ठसे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. यावेळी श्वान ही जवळपास घुटमळल्याने, चोरांचे ठोस माग काढता आले नसल्याचे समजते.

हे इंडिकॅश टाटा प्रोटक्ट एटीएम मशीन गॅस कटरने फोडून साडेपाच लाख रोख रक्कम चोरी करण्यात दरोडेखोर यशस्वी झाले आहेत. या दरोडेखोरांनी एटीएम मशीनच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याला तसेच परिसरातील सीसीटीव्हीला स्प्रे मारल्यानंतर चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. या भागातील प्रिंगर प्रिंटचेही नमुने घेण्यात आलेत. चोरीचा सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

फागणेतही एटीएम फोडण्याचा प्रयत्न

सुरत-नागपूर महामार्गावरील धुळे तालुक्यतील फागणे गावातही चोरट्यांनी एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने चोरट्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरल्याने एटीएममधील रोकड बचावली. मात्र एटीएम मशिनचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महाजन यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी केली. तसेच एचडीएफसी बँकेच्या संबंधीत अधिकार्‍यांनाही कळविण्यात आले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरी करण्याच्या पध्दतीवरून कापडण्यात एमटीएम फोडणार्‍या चोरट्यांनीच फागणेतही एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या