जळगाव | Jalgaon
जिल्ह्यातील पाचोरा येथील परधाडे रेल्वेस्थानकाजवळ (Pardhade Railway Station) पुष्पक एक्स्प्रेसचा भीषण अपघात घडला आहे. मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने (Pushpak Express) अचानक ब्रेक मारल्याने त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे काही प्रवाशांना आग लागल्याची भीती व्यक्त केली. यामुळे भयभीत झालेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. त्यामुळे यात ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसच्या बोगीत आग (Fire) लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी (Passengers) रेल्वेतून उड्या मारल्या. यावेळी समोरून येणाऱ्या बंगळूरु एक्स्प्रेसने धडक दिल्याने यात पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजते. पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धुर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बंगळुरु एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती आहे. यात काहींचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे कर्मचारी (Police and Railway Employees) घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यानंतर प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. तर आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्स्प्रेसमधून ३५ ते ४० प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्याचे सांगितले जात आहे.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, “परधाडे गावाजवळ ही घटना घडली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. तर काही लोकांचे म्हणणे आहे की आग लागल्याच्या अफवेने लोकांनी उड्या मारल्या. १५ ते २० मिनिटात प्रांत अधिकारी आणि कलेक्टर घटनास्थळी पोहचत आहेत. घटनास्थळी पोहचायला जळगावहून ३० ते ४० मिनिटं लागतात. पण जोपर्यंत इथं कोणी जाणार नाही तोपर्यंत हे लक्षात येणार नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.