Saturday, November 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक विभागात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; १२० अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित

नाशिक विभागात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; १२० अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित

३.७८ कोटींचा अन्नसाठा जप्त

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाने विशेष मोहीम राबवत भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात धडक कारवाई केली आहे. १६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल १२० अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच सुमारे ३ कोटी ७८ लाख रुपये किमतीचा तब्बल २ लाख २७ हजार किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अन्न व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सण उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील विविध अन्न उत्पादन, विक्री आणि साठवणूक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली.

जिल्हानिहाय कारवाईचा विचार करता नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६५ अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात २३, धुळे जिल्ह्यात १३, अहिल्यानगर जिल्ह्यात १०, तर नंदुरबार जिल्ह्यातील ९ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

मिठाई, तेल, मसाल्यांचा मोठा साठा जप्त
या विशेष मोहिमेत मिठाई, चिवडा, खाद्यतेल, मसाले, फरसाण, खोया, बटर, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, खवा, मावा आणि भगर यांसह विविध अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये मसाले, खाद्यतेल, मिठाई आणि फरसाण या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. जप्त केलेल्या अन्नसाठ्याची अंदाजित किंमत ३ कोटी ७८ लाख रुपयांहून अधिक असल्याने कारवाईची व्याप्ती स्पष्ट झाली आहे.

अस्वच्छता, निकृष्ट दर्जा अन् नियमबाह्य लेबलिंग
तपासणीदरम्यान काही आस्थापनांमध्ये अन्नपदार्थांचे उत्पादन आणि साठवणूक अस्वच्छ व अयोग्य परिस्थितीत होत असल्याचे निदर्शनास आले. काही अन्नपदार्थ विहित गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचा तसेच ते असुरक्षित असण्याचा संशय आढळून आला. याशिवाय पॅकेजिंग आणि लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन करून चुकीची माहिती छापण्यात आल्याचेही उघड झाले.

खाद्यतेलाच्या पुनर्पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या डब्यांचा पुनर्वापर केला जात असल्याचे आढळले. काही खाद्यतेलाच्या पॅकिंगवर ‘फोर्टिफाइड ऑइल’ असा दावा करण्यात आला होता. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला वैध फोर्टिफिकेशन परवाना उपलब्ध नसल्याचे तपासणीत समोर आले. मिठाईमध्ये खाद्यरंगाचा विहित मर्यादेपेक्षा अधिक वापर करण्यात आल्याचेही निदर्शनास आले.

तक्रारींसाठी ऑनलाइन सुविधेचा वापर करण्याचे आवाहन
अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या निकषांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी तपासणी व कारवाईची मोहीम यापुढेही नियमितपणे सुरू राहणार आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करावे आणि आवश्यक परवाने घेऊनच व्यवसाय करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

ताज्या बातम्या

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार

0
घोटी । जाकीर शेख Ghoti इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून...