अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यात दिल्या जाणार्या शालेय जेवणात अन्नातून विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने शासन निर्णयाव्दारे पोषण आहाराबाबत सुधारित तरतुदी जाहीर केल्या आहेत. यात पोषण आहार तयार केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो पोषण आहार वाटण्यापूर्वी अर्धा तास आधी मुख्याध्यापक, शिक्षक किंवा स्वयंपाकघरातील मदतनीस यांनी तो आहार खाऊन बघावा. तसेच, पोषण आहार खाऊन बघणार्यांचं मत नोंदवही बनवून त्यामध्ये नोंदवलं जावं, तसेच अन्न औषध प्रशासन विभागाने आता शाळांमध्ये जावून पोषण आहारात पुरवठा होणार्या धान्य आणि पाणी याची तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात पोषण आहारातून विषबाधेच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नव्याने सुधारीत सविस्तर आदेश काढले आहेत. यात प्रत्येक शाळांमधील स्वयंपाकघरातील सुविधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेची खात्री करण्याच्या देण्यात आल्या आहेत. जर शाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली, तर जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोषण आहाराबाबत शालेय शिक्षण विभागानं मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकघर मदतनीस, आरोग्य अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन यांना विशिष्ट जबाबदार्या सोपवल्या आहेत.
यात शाळांमध्ये दिल्या जाणार्या अन्नाची गुणवत्ता तपासणं आणि 24 तास नमुने जपून ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या जेवणाची चव आधी शिक्षक, स्वयंपाकघरातील मदतनीस किंवा पालकांकडून तपासली जाईल. वापरलेलं धान्य, मसाले इत्यादी एक वर्ष टिकणारं असलं पाहिजेत. अन्न हाताळण्यापूर्वी हात धुण्यासाठी साबण आणि स्वच्छ पाणी उपलब्ध असणं देखील बंधनकारक करण्यात आलं आहे. खाल्ल्यानंतर उलट्या, पोटदुखी किंवा ताप यासारखी लक्षणं आढळल्यास, तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधणं आवश्यक आहे. पुरवठादारांनी पुरवलेल्या धान्याची गुणवत्ता तपासणं आवश्यक आहे. जिल्हा पातळीवर दर महिन्याला धान्याचा नमुना तपासला जाईल, अन्न व औषध प्रशासन विभागाने ही तपासणी करण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पुरवठेदाराकडून शाळास्तरावर तांदूळ आणि इतर धान्य माल स्वीकारताना या मालाचा दर्जा चांगला असल्याची खात्री करुनच त्याचा स्वीकार करावा. तांदुळ आणि इतर धान्य चांगल्या दर्जाचं नसल्यास हा माल बदलून देण्याबाबत संबंधित पुरवठेदारांना तत्काळ सांगावं. पुरवठेदाराकडून तेल, मीठ, तिखट आणि गरम मसाला यांचा शाळास्तरावर पुरवठा झालेल्या मालाच्या दर्जाची तपासणी करावी व वापरण्याची मुदत पुढील एक वर्षाची असेल याची खात्री करुन घ्यावी. पोषण आहारासाठी धान्याची साठवणूक करण्यात येणारी जागा जमिनीपासून उंचीवर असल्याची खात्री करावी. जेणेकरुन ओलावा आणि अन्य बाह्य घटकांपासून धान्याचं रक्षण होईल. योजनेंतर्गत शिजवण्यात आलेल्या आहाराची नियमित तपासणी करावी. स्वयंपाकगृह परिसरात किडे, झुरळे, उंदीर, घुशी, साप, मांजर यांचा वावर असणार नाही यासाठी उपाययोजना करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पोषण आहारासाठी धान्य पुरवणार्या पुरवठादाराच्या गोदामांची भारतीय अन्न महामंडळामार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. तसेच त्या गोदामातील तांदुळाचे तीन नमुने संकलित करण्यात यावे, अशा सूचना संबंधित शिक्षणाधिकारी, भारतीय अन्न महामंडळ आणि पुरवठा विभागाच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत. गोदामांच्या तपासणीदरम्यान गोदाम अस्वच्छ आढळून आल्यास संबंधित पुरवठेदाराला समज देवून 50 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात यावी. तसेच, दुसर्या तपासणीच्या वेळी गोदाम अस्वच्छ आढळून आल्यास ठेकेदाराला 1 लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.




