Friday, May 17, 2024
Homeअग्रलेखदिवाळीसाठी... झाले मोकळे आकाश!

दिवाळीसाठी… झाले मोकळे आकाश!

आज धनत्रयोदशी! पारंपरिक भाषेत धनतेरस! मराठी मुलखातील दिवाळीची सुरुवात वसुबारस पासून होते. वसुबारसेला गोधनाची पूजा केली जाते. तथापि सामान्यत: देशभरात मात्र दिवाळीला धनतेरसपासूनच सुरुवात मानली जाते. त्या अर्थानेही आज दिवाळीचा महत्वाचा दिवस. या दिवसाचे महत्व आणखी वाढेल आणि दिवाळीच्या आनंदात भर पडेल असे बरेच काही घडत आहे.

कोरोनाचा कहर सध्या मर्यादित झाला असल्याचे सांगितले जाते. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून त्यामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्याही कमी होत आहे. देशातील 48 जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची स्थिती फारशी चांगली नाही, त्यात महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. कोरोनाची साथ कधी संपेल हे निश्चित नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

- Advertisement -

त्यामुळे कोरोनासह जगणे लोकांनी स्वीकारले आहे याचा दिवाळीच्या निमित्ताने प्रत्यय येत आहे. आणखीही काही गोष्टींची कमतरता माणसांना जाणवत आहे. सरकारी कृपेने गॅस आणि पेट्रोल यांची किंमत वाढतच आहेत. पण हे तर रोजचेच रडगाणे असे म्हणत दिवाळी आनंदात कशी जाईल हाच सर्वांचा प्रयत्न आहे. दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहात आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. कामगारांना बोनस जाहीर झाला आहे.

अनेक व्यावसायिक आस्थापना आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये वेतनवाढीचे करार झाल्याचे माध्यमांत जाहीर झाले आहे. यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होणे स्वाभाविक आहे. छोट्यामोठ्या खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. आर्थिक परिस्थितीने कमकुवत माणसेही त्यांच्या परीने दिवाळी साजरी करतात. ‘एक तरी दिवा लागो माझ्याही अंगणात’ अशीच सर्वांची भावना असते. त्यासाठी माणसेही आपापल्या परीने धडपडत असतात.

कोरोनामुळे अनेकांनी आप्तेष्ट किंवा निकटवर्तीय गमावले. अनेक मुलांनी आपले एक तरी पालक गमावले आहेत. अशा कुटुंबांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी यासाठी पुण्याच्या महापौरांनी पुढाकार घेतला आहे. पुणे परिसरातील अशा सर्व कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. दिवाळी फराळाचे वाटप असे त्यांच्या या उपक्रमाचे स्वरूप आहे. गेली काही वर्षे दिवाळी आणि संगीत यांचे मैत्र अधिकाधिक दृढ होत आहे. गावोगावी ‘पाडवा पहाट’ रंगत आहेत.

कोरोनामुळे गेले दोन वर्षे हे सूर तात्पुरते निमाले होते. यावर्षी काही ठिकाणी पाडवा पहाट पुन्हा एकदा रंगणार असल्याचे जाहीर झाले आहे. मुंबईच्या गिरणगावात स्थापन झालेली ‘चतुरंग प्रतिष्ठान’ ही संगीत, नाट्य, शिक्षण, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात भरीव काम करणारी संस्था. या संस्थेची यंदा सुवर्णमहोत्सवी पाडवा पहाट रंगणार असल्याचे जाहीर झाले आहे. नाशिकमधील पिंपळपारावर देखील यावर्षी सूर गुंजणार आहेत. ‘देशदूत’नेही यावर्षी ‘सुरमयी दिवाळी’ हा दिवाळी अंकासोबतच नवीन उपक्रम राबवला.

तो वाचक आणि रसिकांच्या पसंतीला उतरल्याचा सुखद अनुभव येत आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले. अशांच्या मदतीसाठी ‘बार्टी’ ही संस्था पुढे आली आहे. राज्यातील अनुसुचित जातींमधील एक लाख तरुण-तरुणींना रोजगारासाठीचे आवश्यक प्रशिक्षण देण्याचा इरादा त्या संस्थेने जाहीर केला आहे. विविध सरकारी आस्थापनांमधील भरतीसाठी आवश्यक तयारी करून घेतली जाणार आहे.

आटोक्यात आल्यासारखे वाटत असले तरी कोरोनाचे आव्हान कायम असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. संसार म्हंटले की काळजीचे, चिंतेचे प्रसंग येतातच. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ असा प्रश्न रामदास स्वामींनी विचारला आहे. तेव्हा दिवाळीचे महत्व लक्षात घेऊन आणि घडणार्‍या अशा सर्व चांगल्या सगळ्या घटना हाच शुभसंकेत समजु यात. आणि नेहेमीची काळजी-चिंता थोड्याशा मागे टाकून दिवाळीच्या आनंदात आठवडाभर सहर्ष सहभागी होऊ यात. ‘देशदूत’च्या सर्वाना शुभेच्छा!

- Advertisment -

ताज्या बातम्या