शिर्डी | प्रतिनिधी | Shirdi
शहरातील गुन्हेगारीला (Crime) आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलत मोठ्या कारवायांचे सत्र सुरू केले आहे. शिर्डीत (Shirdi) नुकत्याच घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर ग्रामसभेत वाढत्या गुन्हेगारीसाठी अवैध व्यवसाय, पॉलिशवाले व एजंट जबाबदार असल्याचे अनेक मान्यवरांनी अधोरेखित केले होते.
सोमवारी युनायटेड किंगडममधील एक भाविक कुटुंब साईंचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आले होते. त्यावेळी योगेश मेहेत्रे, अरुण त्रिभुवन आणि सुरज नरवडे (सर्व राहणार शिर्डी) यांनी त्यांच्या चारचाकी वाहनाला अडवून पार्किंग व्यवस्था करून देतो असे सांगितले. त्यानंतर दर्शन रांगेकडे नेताना त्यांनी भाविकांना (Devotees) प्रदीप त्रिभुवन यांच्या मालकीच्या ‘नंदादीप फुल भांडार’ या हार-प्रसाद दुकानात नेले. तिथे मोबाईल ठेवण्याच्या बहाण्याने चार हजार रुपयांचे पूजेचे साहित्य विकले व पाच हजार रुपये भरल्यास व्हीआयपी दर्शन मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
भाविकांनी दर्शन पास घेण्यास नकार दिला, मात्र त्यांनी पाच हजार रुपयांना पूजेचे साहित्य घेतले. काही वेळानंतर त्यांनी दुसऱ्या दुकानदाराकडे (Shopkeeper) याच साहित्याची किंमत विचारली असता त्याने केवळ ५०० रुपये सांगितल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ साई संस्थान प्रशासनाकडे तक्रार केली. संस्थान सुरक्षा विभागाचे पोलीस अधिकारी रोहिदास माळी यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये (Shirdi Police Station) रीतसर फिर्याद दाखल केली.
पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाने तातडीने आरोपींना (Accused) ताब्यात घेतले व त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, शिर्डीत पॉलिशवाले आणि एजंट यांच्यावर कारवाई सुरू असताना प्रथमच एका हारप्रसाद विक्रेत्यावर गुन्हा (Case) दाखल झाला आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांत दहशतीचे वातावरण आहे. ग्रामसभेत निर्णय झाल्यानंतरही भाविकांची फसवणूक (Fraud) सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, या घटनेमुळे शिर्डीची देश-विदेशात बदनामी होत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.