नाशिक | प्रतिनिधी Nashik
रविवार कारंजा परिसरात एका नामांकित दुकानावर सोमवार (दि. ४ जुलै) रोजी वनविभागाकडून धाड टाकण्यात आली. या धाडीत विविध प्रकारच्या वन्यप्राण्यांचे अवयव मिळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे…
अधिक माहिती अशी की, नाशिक वनपरिक्षेत्राचे विवेक भदाणे यांना रविवार कारंजा परिसरातील तेली गल्लीत असलेल्या एका नामांकित दुकानात विविध वन्यप्राण्यांचे अवयव असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास या दुकानात वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक, इगतपुरी व राऊंड स्टाफ नाशिक यांच्यासह पथकाने धाड टाकली. यावेळी दुकानात वन्यप्राण्यांचे अवयव मिळून आले.
याप्रकरणी वन्यजीव अधिनियम १९७२ कलम चे ९, ३९ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांच्या अवयवांची ओळख मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.