१९८४ मधील शीखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. तब्बल ४१ वर्षांनी न्यायालयाने निकाल दिला असून, सज्जन कुमार यांना १८ फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. राऊस अव्हेन्यू कोर्टाने हा निकाल जाहीर केला आहे.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती. यानंतर दिल्लीत शीखविरोधी दंगली उसळल्या, ज्यामध्ये अनेक शीख समुदायाच्या लोकांना जीव गमवावा लागला. या दंगलीत अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप होता, आणि काही दोषींना याआधीच शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आलेले प्रकरण १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात घडलेल्या हत्याकांडाशी संबंधित आहे. या घटनेत पिता-पुत्राची हत्या करण्यात आली होती. सज्जन कुमार आधीच दिल्ली कँटमध्ये घडलेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
राऊस अव्हेन्यू कोर्टाने पश्चिम दिल्लीतील राज नगर भागात सरदार जसवंत सिंह आणि सरदार तरुण दीप सिंह यांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार यांना दोषी ठरवले. हा निकाल शीख समुदायासाठी महत्त्वाचा ठरत असून, न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडितांना दिलासा मिळाला आहे.