सार्वमत
औरंगाबाद – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई मनसेचे नेते व कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणातून निवृत्ती घेताना त्यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. जाधव यांचा हा निर्णय मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून जाधव यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमध्ये इतरांप्रमाणेच मी वाचनाचा छंद जोपासतोय. अध्यात्मिक वाचन करत आहे. हे सगळं करत असताना मला काही गोष्टींची जाणीव झाली. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो. त्या कितपत खर्या आहेत असं वाटू लागलं. त्यातून मी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. यापुढं संजना ही माझी राजकीय उत्तराधिकारी असेल.
कोणालाही कुठल्याही प्रकारचे प्रश्न वा अडचणी असतील तर त्यांनी संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्याव्यात, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.