कर्नाटक | Karnataka
जेडीएस पक्षाचा माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णाला (वय ३४) बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या महिलेवरील बलात्कारप्रकरणी प्रज्वल रेवण्णावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षभरापासून याप्रकरणी न्यायालयीन खटला सुरू होता, अखेर आज बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने प्रज्ज्वल रेवण्णा यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रेवण्णाला १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेला ७ लाख रुपये भरपाई देण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. बंगळूर लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने शनिवारी ही शिक्षा सुनावली.
कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील गन्निकाडा फार्महाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णाला दोषी ठरविण्यात आले होते. २०२१ मध्ये पीडितेवर दोनदा बलात्कार झाल्याचा आरोप असून, प्रज्ज्वल रेवण्णाने हे कृत्य त्याच्या मोबाईलवर चित्रित केले होते.
बंगळुरुमधील विशेष न्यायालयाने काल (शुक्रवारी ता. 1) जनता दल (सेक्युलर) चे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला बलात्कार, लैंगिक छळ, पुरावे नष्ट करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले. रेवण्णाच्या अटकेनंतर जवळपास १४ महिन्यांनी आणि हा खटला सुरू झाल्यानंतर आठ आठवड्यांच्या आत न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी हा निकाल सुनावला. शुक्रवारी ज्यावेळी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले त्यावेळी तो न्यायालयात होता. त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
प्रज्वल रेवण्णाने त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर दोनदा बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडितेने घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले. अत्याचार होत असताना अंगावर असलेली साडीदेखील तिने पुरावा म्हणून जपून ठेवली. पोलीस तपासात या साडीवर विर्य सापडले. त्यामुळे प्रज्ज्वल विरोधात अतिशय ठोस पुरावा मिळाला. या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीत साडी महत्त्वाचा पुरावा ठरली. प्रज्ज्वल रेवण्णा विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांच्या अंतर्गत आरोप झाले होते. न्यायालयानं रेवण्णाला कालच दोषी ठरवलं. त्यानंतर न्यायालयानं आज शिक्षा सुनावली.
काय होतं प्रकरण?
प्रज्वल रेवण्णावर २०२१ पासून महिलांवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आणि या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता रेवण्णावर बलात्कार, धमकी देणे आणि अश्लील फोटो लीक करणे अशा कलमांखाली आरोप करण्यात आले होते. गेल्या वर्षी सेक्स स्कॅण्डलमध्ये समोर आल्यानंतर रेवण्णाचे नाव चर्चेत आले होते. रेवण्णावर ५० हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीआयडीच्या विशेष तपास पथकानं २ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. या पथकाने तपास करताना १२३ पुरावे गोळा केले. तपासाचे नेतृत्त्व सीआयडीच्या निरीक्षक शोभा यांनी केले. या प्रकरणाची सुनावणी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सुरु झाली. न्यायालयाने २३ जणांच्या साक्षी नोंदवल्या. सात महिन्यांमध्ये सुनावणी पूर्ण झाली.
कोण आहे प्रज्वल रेवण्णा?
प्रज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान एच डी देवेगौडांचे नातू आहेत तर त्यांचे वडील कुमारस्वामी सध्या केंद्रात अवजड उद्योग मंत्री आहेत. हे प्रकरण २४ एप्रिल २०२४ रोजी हासनच्या स्टेडियमवर शेकडो पेन ड्राइव्ह सापडल्याने समोर आले. या पेन ड्राइव्हमध्ये प्रज्वल रेवण्णांचे दोन हजार आठशे सत्तर व्हिडीओ क्लिप्स आणि फोटो होते. व्हिडीओत अनेक महिलांसोबतचे शरीरसंबंध दिसून येत होते. त्यानंतर, याप्रकरणी पन्नास महिलांच्या तक्रारी आल्या असून, बारा महिलांनी बलात्काराचा आरोप केला आहे. व्हिडीओ समोर येताच रेवण्णा भारताबाहेर निघून गेला होता. ३१ मे रोजी जर्मनीतून भारतात येताच त्याला अटक करण्यात आली. खटल्यात सव्वीस साक्षीदार, शंभर ऐंशी कागदपत्रे आणि अडतीस सुनावण्या झाल्या आहेत. प्रज्वलला दहा वर्षांपर्यंतची कैद ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा वर्तवण्यात येत होती. अखेर, आज त्याला विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




