मुंबई | Mumbai
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) नुकसान झालेल्या नाशिकमधील (Nashik) द्राक्षबागांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी कर्जमाफीच्या (Loan Waivers) मुद्यावर बोलतांना ‘जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावे. कर्ज घ्यायचे आणि पाच ते दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचे नाही. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी आहेत. शेततळ्यासाठीही आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीकविम्याचे पैसे पाहिजेत, याचे पैसे पाहिजे. मग साखरपुडे करा, लग्न करा, असे वादग्रस्त विधान केले होते.
तर याआधी कोकाटे यांनी ‘भिकारीही एक रुपया घेत नाही. मात्र, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देत आहोत. तरीही त्याचा गैरवापर केला जातो, असे वक्तव्य केले होते. कोकाटेंच्या या दोन्ही वक्तव्यांवरून त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले होते. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तंबी दिली होती. यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कोकाटे यांच्या हकालपट्टीची मागणी करत त्यांच्यावर निशाणा साधला. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना शेट्टी म्हणाले की, “मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात (Cabinet) ठेवू नये. अजित पवारांनी समज दिल्यानंतरही त्यांचे बेताल वक्तव्य थांबलेले नाहीत. माणिकराव कोकाटे यांनी केंद्रात जाऊन जे आयात शुल्क आता शून्य टक्क्यावर आणले ते जर दोन महिन्यापूर्वी आणले असते तर संपूर्ण कांदा जगाच्या बाजारामध्ये विकला गेला असता. स्वतःलाही जमत नाही आणि केंद्रालाही जाब विचारण्याची हिंमत नाही, असा टोला त्यांनी यावेळी माणिकराव कोकाटे यांना लगावला आहे. तसेच शेतकऱ्यांना शहाणपणा शिकवण्यापेक्षा माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “महायुतीने (Mahayuti) निवडणुकीच्या काळात सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. हमीभावाच्या २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, या दोन्ही घोषणा हवेत विरल्या आहे. शेतकरी आक्रमक झालेला असून आमचीही जनजागृती सुरू आहे. प्रहारने जसे सत्ताधाऱ्यांच्या घरी जाऊन आंदोलन केले तसे आम्ही महायुतीच्या मंत्र्यांना कार्यक्रमात जाऊन जाब विचारणार आहोत”, असा इशाराही यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.
ते पुढे म्हणाले की, “अजित पवार सांगतात आम्ही आता सातबारा कोरा करू शकत नाही, राज्याची तशी स्थिती नाही. मग महायुतीने खोटं अश्वासन का दिलं, शेतकऱ्यांना का गंडवलं? राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे तर, शक्तिपीठ सारखे खर्चिक प्रकल्प महाराष्ट्रावर (Maharashtra) का लादत आहात? तुमची औकात नव्हती, तुम्हाला जमत नव्हते, तर आश्वासन का दिले?” असा सवाल देखील यावेळी राजू शेट्टी यांनी केला.