दिल्ली | Delhi
सलमान खान, कुलभूषण जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यासह देशातील अनेक हायप्रोफाईल खटले लढवणारे ज्येष्ठ वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले आहेत. हरीश साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी तिसऱ्यांदा लगीनगाठ बांधल्याचं वृत्त आहे. मैत्रीण त्रिनासोबत लंडनमध्ये नुकत्याच एका शाही विवाह सोहळ्यात ते बोहल्यावर चढले. त्यांच्या लग्नसोहळ्याचे काही फोटोज, व्हिडिओज सध्या सोशल मीडीयामध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.
हरीश साळवे यांनी नुकतंच त्रिना यांच्यासोबत थाटामाटात लग्न केलं आहे. त्रिना मुळची ब्रिटनची आहे. हरीश साळवे यांच्या लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी आणि उज्ज्वला राऊत यांच्यासह जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. यापूर्वी, मीनाक्षी (पहिली पत्नी) आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड (२०२०) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. साळवे आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मीनाक्षी यांनी ३८ वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जून २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला असून दोघांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.
हरीश साळवे हे बऱ्याच हाय-प्रोफाइल केसेसचा भाग होते. सलमान खानला काळवीट शिकारप्रकरणी तीन दिवसांत अंतिम जामिन मिळवून देणारे वकील हरीश साळवेच होते. याशिवाय त्यांनी सलमान खानच्या हिट अँड रन खटल्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. इतकंच नव्हे तर पाकिस्तानमध्ये मृत्यूची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांचाही खटला हरीश साळवे यांनी लढवला होता. यासाठी त्यांनी भारत सरकारकडून फक्त एक रुपये फी घेतली होती. नोव्हेंबर १९९९ ते २००२ पर्यंत भारताचे सॉलिसिटर म्हणून हरीश साळवे कार्यरत होते. त्यानंतर हरीश साळवे यांची नियुक्ती वेल्स आणि इंग्लंडच्या न्यायालयांसाठी राणी वकील म्हणून करण्यात आली होती.