Tuesday, October 22, 2024
Homeनगरमोटारसायकल गोदापात्रात पडून कमालपूर बंधार्‍यात चौघे बुडाले

मोटारसायकल गोदापात्रात पडून कमालपूर बंधार्‍यात चौघे बुडाले

एकाला वाचविण्यात यश || वृध्देचा मृतदेह सापडला || दोघांचा शोध सुरु

माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgav

श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीवरील कमालपूर केटीवेअर बंधार्‍यावरून शेतमजुरीची कामे आटोपून मोटारसायकलवरून घराकडे जात असताना एका वृध्द महिलेसह चौघे जण बंधार्‍यावरून पाण्यात पडून बुडाले. एकास वाचविण्यात मासेमारी करणार्‍या तरुणांना यश आले असून वृध्द महिलेचा मृतदेह सापडला आहे. अन्य दोघांचा रात्री उशीरापर्यंत शोध सुरू होता. शनिवारी दसरा सणाच्या दिवशीही पावसाच्या शक्यतेमुळे शेती कामे सुरूच होती. दिवसभर मोलमजुरीची शेतातील कामे आटोपून हे आदिवासी समाजातील मजूर सायंकाळी सुर्यास्तासमयी नदीकाठावरील घराकडे निघालेे होते.

- Advertisement -

मात्र कमालपूर बंधार्‍यावरून दुचाकी, चारचाकी वाहन चालविणे म्हणजे मोठी कसरत असते. बंधार्‍यालरील काँक्रिट खड्ड्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सणाचा दिवस असल्याने घराकडे जाण्यासाठी उशीर झाल्याने घाईगडबडीत खड्ड्यांमुळे चालकाचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. बंधार्‍यास लोखंडी कठडे नसल्याने मोटारसायकलसह चौघेजण बंधार्‍यातील पाण्यात भामाठाणच्या बाजूने पडले. सायंकाळच्या वेळी बंधार्‍यावरून तुरळक वर्दळ सुरू होती. आरडा-ओरड झाल्यावर स्थानिक लोक मदतीला धावले. श्रीरामपूर हद्दीतील बंधार्‍यावर पाटबंधारे कर्मचारी सोमनाथ शिरसाठ जवळच राहतात. ते घटनास्थळी मदतीला धावून आले. स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने सुरू झालेल्या मदतीने या चौघांपैकी मच्छिंद्र गोपीनाथ बर्डे (वय 25) याला वाचविण्यात यश आले. तर वेणुबाई मनोहर बर्डे (वय 70) या वृध्द महिलेचा मृतदेह सापडला. मात्र दिलीप सोमनाथ बर्डे (वय 30) व रवी सोमनाथ मोरे (वय 25) या दोघांचा रात्री 11 वाजेपर्यत शोध सुरु होता. मात्र त्यांचा शोध लागलेले नव्हता.

यावर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यातील पाण्याचा फुगवटा कमालपूर बंधार्‍यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे बंधार्‍यात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. यामुळे बंधार्‍यात पडलेल्या तरुणांना शोधण्यात मोठी अडचण येत आहे. दरम्यान रात्री उशिरा ही शोध मोहिम थांबविण्यात आली. आज रविवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील आपत्ती निवारण पथक येणार असून त्यानंतर दोघांचा शोध पुन्हा सुरु होणार आहे. बंधार्‍यात बुडालेले हे सर्व आदिवासी समाजाचे व कमालपूर गावातील असल्याने ग्रामस्थांसह आदिवासी बांधवांवर शोककळा पसरली आहे.

मदतीला श्रीरामपूर तालुका पोलीस, खबर विरगाव पोलिसांत
या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, टाकळीभान औट पोस्टचे पोलीस हवालदार राजेंद्र त्रिभूवन व बाबा ढवळे तातडीने घटनास्थळी पोहचले. यावेळी पाटबंधारे कर्मचारी शिरसाठ यांनी सांगितले की या बंधार्‍यात एकूण 52 मोर्‍या असून 34 श्रीरामपूर हद्दीत तर 18 वैजापूर हद्दीत आहे. हा अपघात 18 मोर्‍यात घडलेला असल्याने श्रीरामपूर पोलीसा समक्ष शिरसाठ यांनी विरगाव ता. वैजापूर पोलिस ठाण्यात खबर दिली. वैजापूरचे पोलीस उप अधीक्षक भागवत फुंदे, विरगाव पोलिस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आपल्या सहकार्‍यांसह दाखल झाले. वैजापूर पोलीस येईपर्यंत श्रीरामपूर पोलीस घटनास्थळी मदत कार्यास सहकार्य करत होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या