पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
येथील चार ते पाच मोटारसायकल व एका रिक्षाची काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड (Sabotage) केल्याची घटना घडली आहे. ही घटना पेठरोडवरील दत्तनगर (DattaNagar) कॅनॉलच्या पलीकडे असलेल्या हरिओमनगरमध्ये मंगळवार (दि.२१) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सदनाच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटीतील पेठरोडवरील दत्तनगर कॅनॉलच्या पलीकडे हरिओमनगर आहे. या ठिकाणी माजी स्वीकृत नगरसेवक उत्तमराव उगले त्याच्या कुटुंबासमवेत उगले सदन येथे राहतात. त्यांच्या सदन परिसर व जवळच काही भाडेकरू देखील वास्तव्यास आहे. यापैकी काही नोकरी तर काही जण व्यवसाय करतात. नित्य नियम दिनक्रम पार पाडून उत्तमराव उगले व येथील रहिवाशी यांच्या घराच्या आवारात रात्रीच्या सुमारास भाडेकरूंची एक रिक्षा व चार मोटारसायकली उभ्या होत्या.
मंगळवार (दि.२१) रोजी पहाटेच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून पेठरोड मार्गे सात ते आठ समाजकंटक हातात दांडके घेऊन आले. यावेळी त्यांनी वाहनातून उतरून रात्रीच्या अंधारात उगले सदनाच्या आवारात उभ्या असलेल्या उत्तमराव उगले यांच्या वाहनासह मनोज चंदनशिव, सागर चंदनशिव आणि मोरे यांच्या चार मोटारसायकलींची, तसेच रिक्षांची तोडफोड केली. तोडफोड करून जाताना असताना यावेळी जवळच्या घरातून एक वृद्ध महिला व त्यांचा मुलगा जागा झाला.
दरम्यान, यावेळी त्यांनी समाजकंटक आल्याने आरडाओरडा केला. मात्र, त्याचवेळी अंधाराचा फायदा घेत ते सर्व समाजकंटक शिवीगाळ करीत वाहनात बसून फरार झाले. त्यानंतर सकाळी ही घटना कळल्यावर उत्तमराव उगले यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया
सदर घडलेल्या प्रकरणाला सध्याच्या राजकीय वातावरणाचा तथा निवडणुकीचा रंग देण्याचा हा डाव असून या प्रकरणात काही पुढाऱ्यांचा देखील हात असल्याची दाट शक्यता वाटते. परंतु ही प्रवृत्ती फार विघातक असून या प्रवृत्तीला पोलीस प्रशासनाने वेळीच आवर घालावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. नजीकच्या झोपडपट्टीतील काही समाजकंटकांकडून या वाहनाची तोडफोड केल्याचा मला संशय आहे. यापुढे असे विघातक कृत्य करण्यास धजावणार नाही असे कडक शासन करावे. पोलीस या समाजकंटकांचा लवकरच शोध लावतील असा माझा ठाम विश्वास आहे. ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे ही वेळीच पोलीस प्रशासनाने ठेचली पाहिजे तरच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.
उत्तमराव उगले, माजी स्वीकृत नगरसेवक तथा पदाधिकारी, भाजपा