नाशिक । प्रतिनिधी Nashik
शहरातील आणखी एका उद्योजकाला पुण्यातील संशयित कुटुंबाने डाळ मिलसाठी आठ कोटींचे कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवून तब्बल ८२ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातला आहे. किशोर बीरजमल भंडारी, योगेश किशोर भंडारी, श्रीपाद किशोर भंडारी, श्यामा किशोर भंडारी (सर्व रा. कुदळवाडी, चिखली, चिंचवड, पुणे) असे फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत.
अविनाश वामन थोरात (६५, रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना डाळ मिल आणि बांधकाम व्यवसायासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी अनेक फायनान्स कंपन्यांकडे पाठपुरावा केला. या दरम्यान नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांची ओळख संशयितांशी झाली. त्यावेळी संशयितांनी थोरात यांना त्यांच्या व्यवसायासाठी पद्मावती कलेक्शन, मयंक फायनान्स यासह आणखी काही फायनान्स कंपन्यांकडून ८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले.
त्यावेळी संशयितांनी थोरात यांच्याकडून कर्ज मंजुरीसाठीच्या प्रोसेसिंग फीच्या नावाखाली वारंवार पैसे घेतले. संशयितांनी यासाठी ८२ लाख ६० हजार रुपये घेतले. पैसे देऊनही संशयितांकडून कोणत्याही कंपनीचे कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या पैशांची मागणी संशयितांकडे केली मात्र तेदेखील संशयितांनी न देता, त्यांच्या पैशांचा अपहार करीत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हेशाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पुढील तपास करीत आहेत.