Sunday, May 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : सायबर भामट्यांना आवारणार तरी कोण?

राज-का-रण : सायबर भामट्यांना आवारणार तरी कोण?

- Advertisement -

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

नाशिक शहरात गेल्या काही वर्षांतील आर्थिक व सायबर फसवणुकीचे जे आकडे समोर येत आहेत ते नुसतेच थक्क करणारे नसून समाजाची बौद्धिक दिवाळखोरी वेशीवर टांगणारेही आहेत. दामदुप्पटसारख्या योजना असोत किंवा शेअर बाजारातील भरघोस परताव्याचे आमिष, सामान्यांच्या कष्टाची कमाई लुटण्याचा एक अखंड गोरखधंदा सध्या सुरू आहे. याला आळा कोण आणि कसा घालणार हा या घडीचा कळीचा प्रश्न बनला आहे.

कबीरा गर्व न कीजिए,
ऊँचा देखि आवास|
काल परसों भूमि लेटना,
ऊपर जामे घास॥
लोभ पाप का मूल है,
लोभ मिटावे मान|
लोभी जन की प्रीतिका,
या हरि या भगवान॥

संत कबीरांनी आपल्या दोह्यांमध्ये लोभाची तुलना काळाशी केली आहे. त्यांच्या मते, लोभी माणूस कधीही समाधानी नसतो. लोभीपणा म्हणजेच लालसा माणसाचा नाश करते, अशी जवळपास सर्वच संतांची शिकवण आहे. संत तुकारामांनीही आपल्या गाथेत लोभी माणसाचे स्वभाववैशिष्ट्य अत्यंत मार्मिकपणे मांडले आहे.

देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं |
आपुलें जाणती परावें जे ॥१॥
तयासि चालतां पाहिजे सिदोरी |

ज्यांच्या मनात केवळ देहबुद्धी आणि लोभ वास करतो, ते स्वतःचे आणि परके असा भेदभाव करतात. अशा स्वार्थी लोकांपासून नेहमीच सावध रहावे लागते. संतांच्या मते, लोभ हे सर्व पापांचे मूळ आणि भक्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. आज एकदम लोभावर राजकारणाची गाडी का घसरली असे वाचकांना वाटू शकते. एकतर सारा जिल्हा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बातम्यांमध्ये गुंग असताना हे काय मध्येच असेही वाटू शकते. परंतु या लोभाची आणि लोभ्यांची दखल घ्यावी अशाच घटना गेल्या काही काळापासून सातत्याने घडत आहेत.

खरे तर तात्कालिक घटना जी घडली ती एवढी चिंतनीय आहे की, हा विषय लेखनासाठी घेण्याविना पर्यायही नव्हता. तर घटना अशी आहे की, जानवलकर नावाच्या एका सुखवस्तू कुटुंबाने शेअऱ मार्केटमध्ये भरपूर परताव्याचे आश्वासन देऊन असंख्य गुंतवणूकदारांना कोट्यवधीची रक्कम गुंतविण्यास भाग पाडून केलेले पलायन. या कुटुंबातील दोघा दिवट्या चिरंजीवांना नाशिकच्या पोलिसांनी रायगडमधून शिताफीने अटक केल्यामुळे हे प्रकरण किमान नाशिककरांना समजले तरी. फ्युचर स्टॉक मार्केट अनॅलिसीस नावाची फर्म काढून चार ते सहा टक्के अशा भरघोस परताव्याचे आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर माळेगाव सिन्नर औद्योगिक वसाहतीतील प्लास्टिक कंपनीत भागीदारीचे आमिषही दाखविले.

या सापळ्यात तब्बल चाळीसहून अधिक लोक सापडले. बरं हे लोक अशिक्षित किंवा अडाणी नाहीत. फसवणूक झालेल्यांमध्ये नामांकित वकील, सरकारी नोकर आणि पोलिस अमलदारांसह अनेकांचा समावेश आहे. गंमत पहा, फसविले गेलेले सगळेच कायद्याचे रक्षक होते. एका ‘स्वयंघोषित’ सुशिक्षिताने तर चक्क ६० लाख रुपये गुंतविले होते. या महाशयांसाठी हेतूत: स्वयंघोषित असा शब्द वापरला, कारण शिक्षणाने शहाणपण येतेच असे नाही, हे या स्वत:ला सुशिक्षित समजणार्‍याने सिद्ध करून दाखविले. या प्रकरणात फसविले गेलेले असे जवळपास सगळेच अतिशहाणे म्हणावे लागतील. कारण व्यावहारिक शहाणपणाला टाळे लावून क्षणिक लोभापायी या लोकांनी आपली सारी आयुष्याची पुंजी घालविली.

सध्या एकट्या नाशिकमध्ये अशा फसवणुकीची शेकडो प्रकरणे पोलिसदरबारी दाखल होत आहेत. सायबर पोलिस ठाण्यात दरवर्षी नोंदविल्या जाणार्‍या गुन्ह्यांची आणि त्यातील रकमांची आकडेवारी पाहिली की, सामान्य ते असामान्य अशा समाजाच्या सर्वच थरातील नागरिकांचा खिसा किती असुरक्षित आहे, हे स्पष्ट होते. शहर सायबर पोलिस ठाण्यात दरवर्षी सरासरी ११० हून अधिक गुन्हे दाखल होतात. या माध्यमातून सुमारे ५५ ते ६० कोटी रुपयांचा गंडा घातला जातो असे ही आकडेवारी सांगते. अशा डिजिटल फसवणुकीव्यतिरिक्त अगदी समोरासमोर बसून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविणार्‍या, पैशांचा पाऊस पाडू असे सांगणार्‍या टोळ्याही सक्रिय आहेत. किरकोळ किंवा फुटकळ रक्कम गुंतवा अन् भरघोस परतावा मिळवा, असे स्वप्न दाखवून लोकांना सर्रास लुटले जात आहे.

या पारंपरिक फसवणुकीचेही वर्षाकाठी सत्तरहून अधिक गुन्हे स्थानिक पोलिसांत दाखल होतात. गेल्या चार वर्षांत तर शेअर मार्केटमधील आर्थिक गुंतवणूक, आभासी चलनातील (क्रिप्टो करन्सी) गुंतवणूक, डिजिटल हाऊस अरेस्ट तसेच विविध योजनांचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण चक्क तिपटीने वाढले आहेत. अल्पावधीत कोट्यधीश होण्याच्या हव्यासापोटी माणसाचा विवेक गोठतो. लालसा ही मानवाच्या विनाशाच्या प्रक्रियेची सुरुवात असते, असे संत म्हणतात, त्याचा मथितार्थ हा अशा घटनांमधून लक्षात येतो. अर्थात, कळतं पण वळत नाही, अशी अवस्था सध्याच्या या ‘स्वयंघोषित सुशिक्षितां’ची झाली आहे. वास्तविक, कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था महिन्याला चार ते सहा टक्के परतावा देऊ शकत नाही, हे साधे अर्थशास्त्र जर या मंडळींना समजत नसेल तर अशांना लुटण्यासाठी जमाना तयारच आहे.

समोरची व्यक्ती जेव्हा बडेजाव दाखवून बोलते तेव्हा तिच्या पार्श्वभूमीची कोणतीही तपासणी न करता आयुष्याची जमापुंजी, निवृत्तीचा फंड वा सोने, जमीन गहाण ठेवून लोक पैसे गुंतवतात. बर्‍याचदा गुंतवणुकीची ही सुवर्णसंधी केवळ तुमच्यासाठीच आहे, इतरांना सांगू नका असे सांगून भामटे लोक गुंतवणूकदारांना मानसिकदृष्ट्या लक्ष्य करतात. स्वाभाविकच, अशा व्यक्ती कोणाचाही सल्ला घेत नाहीत आणि जेव्हा आपण नाडले गेलोय याची जाणीव होते तेव्हाही या मूर्खपणाला लोक हसतील या भावनेने लवकर तक्रारीही करीत नाहीत. लोभ, लालसा माणसाची मती भ्रष्ट करते, याची प्रचिती अशा घटनांमधून येते. मनुष्यस्वभावातील गुणविशेषांचा नेमका अभ्यास करून हे भामटे दिवसाढवळ्या ही लूट करीत आहेत. अशा घटनांना आवर घालणे किंवा नियंत्रण आणणे हे पोलिसांचे नव्हे तर आमिषाला बळी पडणार्‍या असंख्य नागरिकांच्याच हातात आहे. माणसांनी लोभापेक्षा आर्थिक साक्षरतेवर, किमान शहाणपणावर भर दिला, सजग, सतर्कता ठेवली तर असे गुन्हे टाळता येऊ शकतात. अर्थात, त्यासाठी मुळात लालसा दूर ठेवावी लागेल. लोभ, लालसा, आमिषं हे माणसाचे शत्रू आहेत. संत कबीरांनी तर लोभ हे पापाचेच दुसरे नाव असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे असे पाप करणार्‍यांना फसवणुकीच्या रूपाने शिक्षा होते, असे फारतर म्हणता येईल.

आजच्या तंत्रस्नेही युगात आपण जितके डिजिटल होत चाललो आहोत, तितयाच तीव्रतेने सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत चाललो आहोत. नाशिक शहरातच नव्हे तर देशभरच गेल्या काही वर्षात आर्थिक व सायबर फसवणुकीचे जे आकडे समोर येत आहेत ते नुसतेच थक्क करणारे नसून समाजाची बौद्धिक दिवाळखोरी वेशीवर टांगणारेही आहेत. दामदुप्पटसारख्या योजना असोत किंवा शेअर बाजारातील भरघोष परताव्याचे आमिष, सामान्यांच्या कष्टाची कमाई लुटण्याचा एक अखंड गोरखधंदा सध्या सुरू आहे. नुकतेच उघडकीस आलेले जानवलकर कुटुंबाचे कोट्यवधींचे फसवणुकीचे प्रकरण या भीषण वास्तवाची केवळ एक झलक आहे. लोकांची लालसा हा या समस्येच्या मुळाशी असला तरी ही वृत्ती अनादिकाळापासून चालत आली आहे. देव-दानवही या मोहपाशातून सुटू शकले नाहीत तर मर्त्य मानवाची काय प्रज्ञा, असेही काहीजण म्हणू शकतील. पण, आजच्या तंत्रज्ञानाने मानवी ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असल्याने अशा भामटेगिरीवर नियंत्रण आणणे, गुन्हेगारांना शयतितया लवकर पकडणे, तांत्रिक अचूकतेच्या जोरावर लुटीच्या घटना रोखणे असे काही उपाय पोलिसांनाही करता आले पाहिजेत.

सायबर गुन्ह्यांचा चढता आलेख पाहता अशा गुन्ह्यांसाठी अत्यंत हुशार अशा सायबरतज्ज्ञांची फळीच्या फळी लागणार आहे. अनेकदा पोलिसांना बाहेरच्या सायबरतज्ज्ञांची गरज लागते. कदाचित तोपर्यंत विलंब होऊन भामटे पसारही होऊ शकतात. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी अशा सायबरतज्ज्ञांची संख्या वाढवावी लागणार आहे. नाही म्हणायला सध्या सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण झाले आहे, पण तेथे मनुष्यबळाची असलेली कमतरता दूर करावी लागेल. या खात्यातर्फे केवळ गुन्ह्यांनंतरची तपासणी यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा गुन्हेगाराच्या सापळ्यात कोणी अडकणारच नाही, यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला आदी फसवणुकीला तत्काळ बळी पडणार्‍या घटकांसाठी प्रशिक्षण, तांत्रिक माहिती यांची नियमित कार्यशाळा घेणेही तेवढेच गरजेचे आहे. हे असे चोहोबाजूने लक्ष घातले तर आणि तरच सायबर गुन्ह्यांना काहीसा अटकाव होऊ शकेल. अलिकडे बँकेतून परस्पर पैसे गहाळ होण्याच्या काही घटनांमध्ये सतर्कता कशी कामाला आली आणि पैसेही कसे परत मिळाले अशा सुवार्ता कानी पडतात. त्याची तीव्रता वाढायला हवी असेल तर आर्थिक, सायबर साक्षरतेसाठी व्यापक प्रशिक्षण किंवा लोकशिक्षणाला खरोखरीच पर्याय राहिलेला नाही. संतांनी धर्माच्या उद्देशाने लोभाची व्याख्या वा परिणाम सांगितले असले तरी आज आर्थिक साक्षरता हाच मानवाचा जगण्याचा मूलमंत्र म्हणजेच धर्म झालेला असल्याने ती शिकवण आजही तेवढ्याच काळजीने लागूही पडते.
मो. ९३२५३८३०९२

ताज्या बातम्या

Ahilyanagar : प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी भाजपच्यावतीने चार उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपच्यावतीने राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे चार उमेदवारी अर्ज नेण्यात आले आहेत. हे...