नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
कमी व्याज दरात कर्ज काढून देऊन कमी किमतीत फ्लॅट खरेदी करून देतो असे आमीष दाखवुन जेष्ठ नागरिकाची १९ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना अंबड पोलिसांनी सापळा रचून अटक करत यांच्याकडून १८ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत जेष्ठ नागरिक फिर्यादी यांनी (दि.४ डिसेंबर) अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली कि,त्यांना संशयितांनी कमी व्याज दरात कर्ज काढून देऊन कमी किमतीत फ्लॅट खरेदी करून देतो असे आमिष दाखविले . त्यांनी फिर्यादीकडून कोऱ्या धनादेशावर सही घेऊन सदर धनादेश सोनाराच्या अकाउंटला वटवून सोनाराकडुन १९ लाख रुपयांचे सोन घेवुन पसार झाल्या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकजग्वेंद्रसिंग राजपुत,पोलीस निरिक्षक गुन्हे सचिन खैरणार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक झनकसिंग घुनावत, अंमलदार मयुर पवार, केशव ढगे,फरीद इनामदार, सचिन वाघ व सुवर्णा सहाणे असे पथक तयार केले होते.
वरीष्ठांच्या आदेशाप्रमाणे अंमलदार मयुर पवार यांनी सतत ६ दिवस नाशिक शहर व ग्रामीण हददीतील ५० पैक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा जाण्याचा व येण्याचा मार्ग शोधुन काढला. तसेच पथकाने प्राप्त फुटेज बातमीदारांना दाखवुन संशयितांची ओळख पटवली व आरोपी लपुन बसलेल्या ठिकाणी छापा टाकुन परवेज अनिस अन्सारी (, वडाळा) ,पंकज निवृत्ती वाजे ( शिवाजी नगर सातपूर, नाशिक ) यांना सापळा रचून अटक केली.
पोलिसांनी संशयितांकडून फिर्यादींची फसवणुक केलेल्या रकमेतुन घेतलेले एकुण १३४.९८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन व वेढणी, गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल व एक मोबाईल असा १८ लाख ९६ हजार ४४२ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.




