Wednesday, May 8, 2024
Homeनगरखोटे सोने खरे भासवून 22 लाखांचे कर्ज उचलले

खोटे सोने खरे भासवून 22 लाखांचे कर्ज उचलले

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

बँकेत सोने तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या गोल्ड व्हॅल्युअरच्या मदतीने बनावट सोने खरे असल्याचे भासवूून बँकेतून 22 लाख 20 हजार 300 रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित बँकेच्या गोल्ड व्हॅल्युअरसह 24 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर लक्ष्मीकांत भानुदास देडगावकर, राजू रामराव बावधाने, चंद्रकांत भागवत गवळी, समीर हसन बेग, विद्या भारत पंडित, वैभव भास्कर आडगळे, शुभम गोरख शिर्के, देविदास नामदेव शिंदे, राकेश संतोष पवार, भारत माणिक पंडित, शरद नानासाहेब पवार, विठ्ठल अजिनाथ गाडे, गणेश शंकर साळवे, अक्षय रावसाहेब बारवकर, अतुल कैलास अनभुले, जयश्री रावसाहेब बारवकर, अजित आकाराम सुरवसे, अलिम इसाक सय्यद, महेश कृष्णाकांत काळे, राहुल अशोक आव्हाड, अमोल रमेश घोडेचोर, पंजाब रामदास रुपनर, सागर रामदास रुपनर, संजय बन्सीलाल सानप यांचा समावेश आहे. मिलिंद मधुकर आळंदे (वय-38, रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सावेडीतील जना स्मॉल बँकेच्या शाखेत 26 ऑक्टोबर 2018 ते 3 फेब्रुवारी 2020 या कालावधीत हा गुन्हा घडला आहे.

नगरच्या सावेडी उपनगरात जना स्मॉल फायनान्स बँकेची शाखा आहे. बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर लक्ष्मीकांत भानुदास देडगावकर आहे. सोने तारण कर्जासाठी सोन्याचे दागिने घेऊन एखादी व्यक्ती आल्यानंतर संबंधित दागिने तपासून त्याची व्हॅल्यू काढून देत असे. तसे प्रमाणपत्र संबंधित व्यक्तीला देण्याचे काम तो करीत होता.

मात्र, देडगावकरने तब्बल 23 जणांना त्यांनी आणलेले धातुचे दागिने सोन्याचे असल्याचे बनावट प्रमाणपत्र दिले. संबंधित 23 जणांनी या बनावट प्रमाणपत्राचा वापर करून बनावट दागिन्यांवर वेगवेगळी 38 सोनेतारण कर्ज प्रकरणे करून बँकेकडून 22 लाख 20 हजार 300 रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर देडगावकर याच्यासह इतर 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या