नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिकच्या सुरक्षेसाठी आता थेट मुंबईतून मदत मिळाली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अॅथॉरिटीने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतील सुरक्षित नाशिकसाठी हातभार लावला आहे. शहरात सीसीटीव्हींचे जाळे घट्ट करण्यासाठी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) 50 लाखांच्या सीएसआर निधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे शहरातील सीसीटीव्ही बसवण्यात येत असलेल्या आयुक्तांच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
सिंहस्थ अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपला आहे. यासाठी शहरभर सीसीटीव्हींचे सुसज्ज जाळे असणे महत्त्वाचे असणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाकडून सुमारे दीड हजार सीसीटीव्ही महापालिका हद्दीत बसवण्यात येणार आहेत. परंतु पोलिसांच्या दृष्टिकोनातून ते पुरेसे नाहीत. यातच हे काम अत्यंत संथपणे सुरू आहे. पोलिसांकडून पाठपुरावा करूनही अद्याप त्यास गती मिळालेली नाही.
दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सीएसआर निधीतून आयुक्तालय हद्दीत सीसीटीव्हींचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प केला. त्यानुसार शहरातील काही औद्योगिक कंपन्यांनी पुढाकार घेत सीएसआर निधी उपलब्ध करून दिला आहे. याचसाठी आयुक्त कर्णिक यांनी मुंबईतील जेएनपीएला 50 लाख रुपयांच्या सीएसआर निधीसाठी प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी मंजुरी दिली आहे. तसे पत्र पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.