दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
दिंडोरीत विहीरीत पडून इंदोरे येथील दरगोडे कुटूंबातील नऊ जण काल रात्री मृत्यूमुखी पडले होते. या नऊ जणांवर इंदोरे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयाची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
काल रात्री 10 वाजेच्या सुमारास दिंडोरी येथील शिवाजीनगरातील विहीरीत खाजगी क्लासेसचा कार्यक्रम आटोपून येणार्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांची कार पाण्यात पडल्याने अपघात झाला होता. त्यात सर्व जणांचा मृत्यू झाला होता. रात्रभर दिंडोरीकर जागे राहिले. रात्री 2 वाजता सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. सकाळी जिल्हा पालकमंत्री तथा आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीष महाजन, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे यांनी दिंडोरीत धाव घेवून अपघातस्थळी भेट दिली. शवविच्छेदननंतर करण्यात आले आणि दुपारी 12 वाजेच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात शव देण्यात आले. शोकाकूल वातावरणात इंदोरे स्मशानभुमित दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार झाले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश हद्य पिळवटून टाकणारा होता.
एकाच वेळी नऊ जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने दरगोडे कुटूंबिय हादरलेच परंतू उसळलेल्या जनसागर सुध्दा हेलावून गेला. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर विहीर बुजविण्याचे काम सुरु झाले असून दोन दिवसात विहीर पूर्ण बुजवली जाईल, असे सांगण्यात आले.
या घटनेनंतर दिंडोरी नगरपंचायत प्रशासन सुध्दा कामाला लागले असून धोकेदायक रस्त्यांची पाहणी, त्यावर उपाययोजना करण्याबाबत नगरसेवकांनी सूचना केल्या आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुध्दा प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या व सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत.




