धुळे – dhule
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गासह विसर्जन स्थळांची आज महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradeep Karpe), आयुक्त देविदास टेकाळे (Commissioner Devidas Tekale) यांच्यासह अधिकार्यांनी पाहणी केली, तसेच सोयी, सुविधांचा आढावा घेतला.
महापालिकेमार्फत गणेश विसर्जनासाठी आवश्यक ती पुर्व तयारी करण्यात आली आहे. या पाहणीप्रसंगी आयुक्त देविदास टेकाळे, उपमहापौर अनिल नागमोते, महिला व बालकल्याण उपसभापती सौ. आरती पवार, पोलीस उपअधिक्षक ईश्वर कातकाडे, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, मोतीराम निकम, प्रमोद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.झाल्टे, अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, एन.के.बागुल, प्रकाश सोनवणे, कमलेश सोनवणे, स्वच्छता निरिक्षक लक्ष्मण पाटील, राजेश वसावे, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार आदी उपस्थित होते.
शहरातील मुख्य विसर्जन स्थळ असलेल्या हत्ती डोह, स्वामी समर्थ मंदिर शिवाजी रोड, अंजन शाह बाबा दर्गा समोर, अग्रवाल भवन शेजारी, कुमारनगर पुल, नकाणे रोड, गणपती मंदिर, रावळनाथ टॉवर, एकविरा देवी मंदिरासमोर या ठिकाणी आवश्यक ती विद्युत व्यवस्था, निर्माल्य व मुर्ती संकलनासाठी वाहन व्यवस्था, कृत्रिम तलाव, आपत्त कालीन व्यवस्था व यासाठी कर्मचारी पथक नियुक्ती करण्यात आली आहे.
यासाठी सर्व स्वच्छता निरिक्षक व त्यांच्या नियंत्रणात एकूण 158 कर्मचारी व वाहने देण्यात आलेली आहे. हत्ती डोह येथे प्रखर झोताचे विद्युत दिवे, हायमास्ट, ध्वनी संक्षेपकाची व्यवस्था तसेच अग्निशमन व्यवस्था करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनाच्या मुख्य मार्गवरील खड्डे तात्पुरता स्वरूपात दुरुस्त करण्यात येत आहे.
गणेश मंडळांच्या स्वागतासाठी महात्मा गांधी चौक येथे स्वागत कक्ष व वैद्यकिय पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच मुख्य मार्गावरील व चौकातील स्वच्छतेबाबत संबंधितांना सक्त आदेश देण्यात आले आहे. मोकाट जनावरे तसेच मुख्य मार्गावरील अडचण असलेल्या झाडांचा विस्तार कमी करणेबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
या सर्व बाबीचा आढावा घेवून याबाबत आज संबंधित अधिकार्यांसमवेत पाहणी करण्यात आली. तसेच भाविकांना व नागरिकांना कोणत्याही प्रकाराची असुविधा व गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. गणेश उत्सव काळात विसर्जन कालावधीत असणार्या अडचणी निवारण करण्यासाठी महापालिकेमार्फत समन्वय अधिकारी म्हणून कैलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.