Friday, May 3, 2024
Homeनाशिकगोदावरी एक्स्प्रेसमध्ये 'श्रीं'ची प्रतिष्ठापना

गोदावरी एक्स्प्रेसमध्ये ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

मनमाड । प्रतिनिधी Manmad

करोना प्रादुर्भावाच्या सावटाखाली आजपासून शहरात गणेशोत्सवास प्रारंभ करण्यात आला. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात शहर परिसरात विघ्नहर्त्याचे जल्लोषात मात्र साध्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. घराघरासह यंदा फक्त 35 ते 40 सार्वजनिक मंडळानी साध्या पध्दतीने छोट्या मंडपात गणपतीची प्रतिष्ठापना केली.

- Advertisement -

रेल्वे बंद असली तरी मात्र भक्त व चाकरमान्यानी यावर्षी लोकोशेडमध्ये उभी असलेल्या मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसच्या पास बोगीत श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पहिल्या आरतीचा मान नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे यांना दिला. शहराचे आराध्यदैवत मानले जाणारे नीलमणी गणेश मंडळाने यंदा मिरवणूक रद्द करून साध्या पद्धतीने गणरायाच्या मूर्तीला पालखीत विराजमान करून पूजाअर्चा केली.

लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद आहे. गणेशोत्सव कसा साजरा करायचा? असा प्रश्न चाकरमाने भक्तांना पडला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने लोकोशेडमध्ये उभ्या गोदावरी एक्स्प्रेसच्या पास बोगीत प्रतिष्ठापना करण्याची परवानगी दिली. परवानगी मिळताच भक्तांनी नेहमीप्रमाणे आकर्षक सजावट करून गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र खैरे, मुकेश निकाळे, संदिप व्यवहारे, भूषण पवार, स्वप्निल म्हस्के, मंगेश जगताप, राजू भडके, अमन म्हसदे, अशोक बिहारी, विवेक शेजवळ, विशाल आहिरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या