Monday, October 14, 2024
Homeनगरबाप्पाला निरोप देण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज!

बाप्पाला निरोप देण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरासह जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे तीन हजार लहान-मोठ्या सार्वजनिक व खासगी गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली असून उद्या (मंगळवारी) अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह सुमारे साडेतीन हजार पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

नगर शहरात पहिला मानाचा गणपती असलेल्या ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते श्री गणेशाची उत्थापन पूजा होऊन सकाळी 10 वाजता मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. माळीवाडा विशाल गणपती नंतर मानाची गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणूक मार्गावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच स्थानिक दुकाने व इतर आस्थापनांच्या कॅमेर्‍यांची ही मदत मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी घेतली जाणार आहे. मिरवणूक मार्ग व त्या लगतच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तैनात करण्यात येणार आहेत. केडगाव उपनगर, सावेडी उपनगर परिसरातही अनेक मंडळे स्वतंत्र मिरवणुका काढणार आहेत.

जिल्ह्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. जिल्ह्यात 2636 लहान-मोठ्या सार्वजनिक व 113 खासगी गणेश मंडळांसह 261 गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेतून श्री गणेशाची स्थापना केली आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, कोपरगाव या प्रमुख शहरासह ग्रामीण भागातील छोट्या- मोठ्या मंडळातील श्री गणेशाचे उद्या विसर्जन केले जाणार आहे. संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यासाठी बंदोबस्त
पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 7 पोलीस उपअधीक्षक, 37 पोलीस निरीक्षक, 63 सहाय्यक व उपनिरीक्षक, 1535 पोलीस कर्मचारी, 947 होमगार्ड, ‘आरसीपी’च्या तीन तुकड्या, ‘क्यूआरटी’च्या दोन तुकड्या, ‘एसआरपीएफ’ची एक कंपनी, ‘आरएएफ’ची एक कंपनी, स्ट्रगींग फोर्स 10, साध्या वेशातील पोलीस पथके, छेडछाड विरोधी पथक, ध्वनीप्रदूषण पातळी मोजण्यासाठी स्वतंत्र पथक असणार आहे.

भिंगारमधील गणेश विसर्जन उत्साहात
भिंगार येथील गणेश विसर्जन मिरवणूक काल, (रविवारी) पार पडली. या मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते मानाच्या देशमुख गणपतीची उत्थापन पूजा दुपारी होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला. गणेशाची मिरवणूक पारंपरिक पध्दतीने फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये काढण्यात आली. या पालखीला पोलीस अधीक्षक ओला यांनी खांदा देत मिरवणुकीस प्रारंभ केला. सायंकाळी विविध गणेश मंडळांकडून मिरवणुका काढण्यात आल्या.

नगर शहरात मुख्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. मिरवणूक मार्गावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नगर शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये तीन उपअधीक्षक, 9 पोलीस निरीक्षक, 31 सहायक व उपनिरीक्षक, 530 पोलीस अंमलदार, 255 होमगार्ड, ‘एसआरपीएफ’चीे एक तुकडी व ‘आरसीपी’ची एक तुकडी तैनात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या