Wednesday, July 29, 2026
HomeराजकीयMaharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले, "आमच्या...

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले, “आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास, अफवांवर…”

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, ‘ऑपरेशन टायगर’ या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे पाच खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या अफवांनी राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे तरुण नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे सर्व खासदार आमच्यासोबतच आहेत, जनतेने कोणत्याही वावड्यांवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisement -

सध्या राजकीय वर्तुळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर हे सत्ताधारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. संसदेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष देशभर विरोधी पक्षांमध्ये तोडफोड करत असल्याचा थेट आरोप आदित्य ठाकरेंनी केला. “लोक अंधभक्त असतात, पण आम्ही आमच्या सहकाऱ्यांवर अंधविश्वास (दृढ विश्वास) ठेवतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या खासदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे, त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, या संभाव्य बंडखोरीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने ‘मातोश्री’ निवासस्थानी सर्व खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. मात्र, पक्षाच्या एकूण ९ खासदारांपैकी तब्बल ५ खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. खासदारांच्या या अनुपस्थितीमुळे उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. “ज्यांना जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. त्यांना जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ? बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाणाऱ्यांना आज ना उद्या पश्चाताप नक्की होईल,” अशी उद्विग्न आणि सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शिवसेनेच्या ऐतिहासिक फुटीनंतर, जवळपास चार वर्षांनी ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मोठ्या बंडखोरीच्या वादळात अडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आगामी १९ जून रोजी शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. हाच मुहूर्त साधून ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या हालचाली राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हे ‘ऑपरेशन टायगर’ पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु काही कायदेशीर आणि संख्याबळाच्या तांत्रिक अडचणींमुळे हे गणित सध्या रखडल्याचीही माहिती आहे.

खासदार बैठकीच्या रूपाने ठाकरेंची पहिली ‘लिटमस टेस्ट’ पूर्ण झाली असली, तरी आता सर्वांचे लक्ष १९ जूनच्या वर्धापन दिन कार्यक्रमाकडे लागले आहे. या कार्यक्रमाला नेमके किती खासदार उपस्थित राहतात, यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे आगामी भवितव्य स्पष्ट होणार आहे. ठाकरे सेना या संकटातून स्वतःला सावरणार की पुन्हा एकदा पक्षाला मोठे खिंडार पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ जुलै २०२६ – ग्राहक हक्कांची डिजिटल चळवळ

0
वाढती महागाई, तांत्रिक आव्हाने आणि शासकीय पातळीवरील धोरणात्मक निर्णय जेव्हा थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागतात, तेव्हा असंतोष व्यक्त करण्याचे...