मुंबई | Mumbai
गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज (शनिवार) राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. शनिवारी लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला (Lalbaug Raja Immersion Procession) जल्लोषात सुरुवात झाली. याच उत्साहात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात 2 वर्षांची चंद्रा वजणदार हिचा मृत्यू (Accident Death) झाला, तर तिचा भाऊ 11 वर्षीय शैलू वजणदार गंभीर जखमी (Injured) झाला असून त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपलेली असताना अज्ञात व्यक्तीने गाडी त्यांच्यावर घातली आणि कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध कलम 106, 125(इ), 281, 184, 187 (भारतीय न्याय संहिता 2023) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.




