घोटी | जाकीर शेख
देवगाव शिवारात रात्रीच्या वेळी वाहन अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा घोटी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल फोन जप्त केले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोडाळा रोड, देवगाव शिवारात फिर्यादी सागर शेदवळ हे कुटुंबासह कारने प्रवास करत असताना अज्ञात आरोपींनी त्यांची कार आडवी लावून वाहन थांबवले. त्यानंतर फिर्यादी व साक्षीदारांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, एटीएम कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण १ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून आरोपी कारसह फरार झाले होते. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे व घोटी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पद्धती, वर्णन व बोलीभाषेचा अभ्यास करून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात शोधमोहीम राबवली. या कारवाईत चार संशयितांना रात्रीभर पाळत ठेवून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये काशिनाथ हरी खोडे (वय २९, रा. भिलमाळ, ता. त्र्यंबकेश्वर), संजय धोंडीराम भांगरे (वय ३०, रा. भिलमाळ), वैभव रंगनाथ झोले (वय १९, रा. धाडोशी) आणि किरण गणपत खाडे (वय २९, रा. धाडोशी) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान त्यांनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत आरोपींकडून MH-15-KC-2337 क्रमांकाची कार तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. फरार आरोपींचा पोलीस पथक शोध घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम., उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे, घोटी पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोउनि प्रतीक भिंगारदे, पोउनि ज्योती नेहे, तसेच पोलीस अंमलदार प्रवीण काकड, नवनाथ शिरोळे, प्रकाश कासार, योगेश यंदे,संदीप नागपुरे, सचिन गवळी, मयूर कांगणे, संतोष दांडे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, किशोर बोडके, नितीन गांगुर्डे, घोटी पोलीस ठाण्याचे संतोष नागरे, लक्ष्मण धकाते, यांच्या पथकाने ही कारवाई केली.




