अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गावठी कट्टा विक्रीसाठी कार मधून अहिल्यानगर शहरात आलेल्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस व कार (एमएच 14 ईसी 9791) असा सात लाख 31 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रविवारी (27 ऑक्टोबर) रात्री पावणे आठच्या सुमारास सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावर गायकवाड हॉस्पिटल समोर पोलिसांनी ही कारवाई केली.
मुदस्सर सादिक सय्यद (वय 20 रा. सरकारी दवाखान्याजवळ, पाथर्डी) व विनोद विजय वाघमारे (वय 19 रा. गोकुळ कॉलनी, कॉलेज रस्ता, राहुरी) अशी पकडलेल्या युवकांची नावे आहेत. पोलीस अंमलदार संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंदाई कंपनीच्या पांढर्या रंगाच्या व्हेरना कार मधून दोन युवक गावठी कट्टा विक्री करण्यासाठी तपोवन रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, दरंदले, महादेव भांड यांच्या पथकाने रविवारी रात्री पावणे आठच्या नमूद ठिकाणी भेट दिली असता गायकवाड हॉस्पिटलच्या समोर एक संशयित कार दिसून आली. पोलिसांनी कार मधून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस व कार असा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील करत आहेत.