अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूरात पाच गावठी कट्टे पकडल्यानंतर सावेडी उपनगरातील मिस्कीन मळा पुलाजवळ घातलेल्या सापळ्यातून गुंजाळे (ता. राहुरी) येथील तरूणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडूनही गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (2 सप्टेंबर) रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे (वय 33, रा. गुंजाळे, ता. राहुरी) हा गावठी कट्टा घेऊन मिस्कीन मळा पुलाजवळ थांबलेला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना मिळाली होती.
त्यांच्या आदेशानुसार तत्काळ पोलीस पथक व पंचांना सोबत घेऊन कारवाई करण्यात आली. छाप्यात लखन सरोदे यास ताब्यात घेण्यात आले. पंचांच्या उपस्थितीत त्याची अंगझडती घेतली असता कमरेला सिल्व्हर रंगाचा, फायबर पट्ट्यांनी बसविलेला गावठी कट्टा व मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस मिळाले. सदर कट्ट्याची किंमत अंदाजे 51 हजार रूपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई निरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार लक्ष्मण खोकले, अतुल लोटके, पंकज व्यवहारे, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, भिमराज खर्से यांच्या पथकाने केली.
नेवाशातून घेतला कट्टा
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सरोदे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने सांगितले की हा कट्टा त्याने अजय शिवाजी मगर (रा. कुकाणा, ता. नेवासा) याच्याकडून घेतला आहे. अजय मगर सध्या पसार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्याविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




