अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पारनेर तालुक्यातील पठारवाडी परिसरात दोन ठिकाणी सुरू असलेली अवैध गावठी दारूची हातभट्टी अड्डे अहिल्यानगरचे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने उद्ध्वस्त केली आहे. विशेष म्हणजे याठिकाणी गावठी हातभट्टी दारूसाठी लागणारे रसायन टिपाड्यामध्ये न बनवता त्यासाठी ‘तळे’च तयार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
बुधवारी (24 डिसेंबर) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अदिनाथ मच्छिंद्र पठारे (रा. पठारवाडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे. या कारवाई दारू बनविण्याचे कच्चे रसायन, तयार दारू, काळा गुळ, नवसागर व इतर साहित्य असा एकुण 18 लाख 66 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांना मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील पठारवाडी परिसरात कुकडी कॅनॉल लगत गावठी हातभतभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पारनेर पोलीस व ग्रामीण विभाग पथकाने सापळा रचून छापा टाकत हातभट्टी उध्दवस्त केली. रसायन बनावण्यासाठी करण्यात आलेले तळे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार प्रकाश बोबडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पारनेरचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पोलीस अंमलदार एस. एन कडूस, गणेश डहाळे, गणेश धुमाळ, रणजीत जाधव, अजिंक्य साठे, प्रकाश बोबडे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने केली.




