अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गावठाण विस्तारात गायरान जमिनीमध्ये घरकुलांसाठी जागा देऊ शकतो. जिल्हा परिषदेने यासाठी संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांचा पुढाकार देऊन गावठाण विस्तारीकरणाचा विषय मंजूर करुन घ्यावा. यामुळे गायरान जागेतील घरकुले नियमित करता येतील. यासाठी महसूल आणि जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन गायरान जमिनीवरील घरकुले नियमित करावेत, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
नगरच्या सहकार सभागृहात जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले, गावठाण विस्तारात गायरान जमिनीमध्ये घरकुलांसाठी जागा देऊ शकतो. जिल्हा परिषदेने संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांना पुढाकार देऊन गावठाण विस्ताराचा विषय मंजूर करुन घ्यावा. संबंधीत घरकुलाच्या नोंदी करुन घ्याव्यात. आपले घर काढले जाणार आहे का? आपण विस्थापित होणार का? या भीतीने गायरान जागेतील घरकुल लाभार्थी घाबरलेले आहेत. शेती महामंडळाच्या जमिनी श्रीरामपूर, राहाता आणि कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना गावठाण विस्तार करुन दिल्याने या ठिकाणी असणार्या घरकुलांना जागा उपलब्ध झाल्या आहेत.
जिल्ह्याचे 82 हजार घरकुलांचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. 100 दिवसांच्या कार्यक्रमात सर्व बीडीओ, गटविकास अधिकारी, क्षेत्र अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांना शासकीय जागा किती उपलब्ध आहे याची माहिती देऊन घरकुल पूर्ण करण्याचे उद्दिष्टे देण्याची गरज आहे. यामुळे अनेकांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध होईल, असेही विखे पाटील म्हणाले.
धनदांडग्यांची अतिक्रणे काढून टाका
शासकीय जागा अडगळीत पडल्या आहेत. गावात गरिबांना राहायला जागा नाही. धनदांडग्यांनी सरकारी जागेत इमारती बांधून ठेवल्या आहेत. गरिबांना निवारा मिळण्यासाठी अशी अतिक्रमणे काढून टाकावी लागणार आहेत. शासनाची कोणतीही योजना बंद होणार नाही. विरोधकांकडे मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे योजना बंद करण्याची दिशाभूल करुन लोकांची फसवणूक करत आहेत, अशी टीका ना.विखे पाटील यांनी केली.