घारगाव |वार्ताहर| Ghargaon
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव बसस्थानक परिसरात गणेशमूर्ती विक्री करणार्या व्यावसायिकाची हातातील सोन्याची अंगठी साधूच्या वेशात आलेल्या एका भोंदूबाबाने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.14) घडला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आंबीखालसा येथील मच्छिंद्र भागुजी कहाणे यांचा घारगाव बसस्थानक परिसरात गणेशमूर्ती विक्रीचा स्टॉल होता. हा व्यवसाय सुरू असतानाच भगवे वस्त्र परिधान केलेला भोंदूबाबा त्यांच्या स्टॉलजवळ आला व एक गणेशमूर्ती हातात घेतली आणि मूर्ती खूप सुंदर आहे असे म्हणत कहाणे यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्याने कहाणे यांचा हात हातात घेत तुमच्या सर्व मूर्तींची विक्री होईल तुम्हाला मोठा नफा मिळेल असे सांगितले. बोलता बोलता त्या भोंदूने कहाणे यांच्या हातात बुक्यासदृश काहीतरी पदार्थ टाकला आणि काही वेळातच तेथून तो निघून गेला. सुरुवातीला नेमके काय घडले हे कहाणे यांच्या लक्षात आले नाही. मात्र, काही वेळाने हातातील बोटाकडे लक्ष गेले आणि त्यांच्या लक्षात आले, बोटात असलेली सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गायब झाली आहे. क्षणातच कहाणे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर यांनी दुचाकी घेत बसस्थानक परिसरात त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. परिसरात बराच वेळ शोध घेतला; मात्र संबंधित भोंदू कुठेही आढळून आला नाही, अशी माहिती मच्छिंद्र कहाणे यांनी दिली. दरम्यान, अशाप्रकारे संशयित व्यक्तींची माहिती घेऊन पोलीस प्रशासनाने आवश्यक ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची विक्री सुरू आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तींकडून नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक होण्याची शक्यता या घटनेवरुन निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती अंगावर हात ठेवत असेल, काही पदार्थ देत असेल किंवा चमत्कार, भविष्य, नफा अथवा शुभ-अशुभच्या नावाखाली जवळीक साधत असेल तर नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
– नितीन आहेर (सरपंच, घारगाव)
सुमारे आठ महिन्यांपूर्वी याच ठिकाणी साधूच्या वेशातील व्यक्तीने माझी एक तोळ्याची सोन्याची अंगठी घेऊन फसवणूक केली होती. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली; मात्र अद्याप या प्रकरणाचा तपास लागलेला नाही. आता पुन्हा त्याच परिसरात अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
– बाळासाहेब कदम (माजी पोलीस पाटील, आंबीखालसा)




