घारी |वार्ताहर| Ghari
कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील घारी येथून 20 जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या महिलेचा (Missing Woman) मृतदेह गुरुवारी घारी ग्रामपंचायत हद्दीतील एका शेतात मिळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संगीता वसंत त्रिभुवन (वय 49) ही महिला 20 जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब असून कुटुंबामध्ये पती, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. जनावरांसाठी गवत आणण्याच्या उद्देशाने दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास गेली होती. त्या दिवसापासून ती पुन्हा घरी परत आली नव्हती. कोपरगाव तालुका पोलिसांचे दप्तरी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. पोलीस तिचा शोध घेत होते. तिचा मृतदेह (Dead Body) येथील शेतकरी रंगनाथ रामजी पवार यांचे गव्हाचे शेतामध्ये तिच्याच घरच्यांना मिळून आला.
यावेळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलिसांच्या फौजपाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहे. डॉ. गोरक्षनाथ रोकडे, उत्तम पवार आदींसह ग्रामस्थ मदत कार्यासाठी त्या ठिकाणी हजर होते. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती संदीप कोळी यांनी दिली. मात्र सदर महिलेचा मृत्यू (Woman Death) कशामुळे झाला. हा घातपात आहे की एखाद्या विषारी प्राण्याचा दंश झाला किंवा अजून काही या पाठीमागे दडलेले आहे या सर्वांची उकल तपासणीचा अहवाल आल्यानंतरच कळेल. मात्र या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.