अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास, शबरी आवास, मोदी आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना यातील 6 हजार 500 हून अधिक घरकुल लाभार्थी महिला अथवा त्यांच्या कुटूंबातील महिला यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश झाला. महिला दिनी महिलांच्या उपस्थितीत नवीन घरकुलातील प्रवेशाचा अभिनव उपक्रम राबवणारी नगर जिल्हा परिषद राज्यात वेगळी ठरली आहे. जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्फत केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून वेगवेगळा घरकुल योजना राबवण्यात येते. चालू आर्थिक वर्षात नगर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनमधील घरकुल 81 हजार 738 मंजूर करण्यात आलेले आहेत.
या मंजूर घरकुलाच्या लाभार्थींपैकी 68 हजार 311 लाभार्थींना घरकुलाचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या घरकुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील 1 हजार 311 ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला. तसेच 2024-25 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेल्या 2 हजार 412 व रमाई आवास, शबरी आवास, मोदी आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजने अंतर्गत पूर्ण झालेल्या 4 हजार 98 घरकुल अशा एकूण 6 हजार 504 घरकुलांमध्ये गृहप्रवेश महिलांच्या हस्ते पार पडला.
यावेळी त्यात्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील महिला लाभार्थी, सरपंच, ग्रामसेवक, संपर्क अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या शुभहस्ते नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे येथील 126 घरकुलांचे भूमिपूजन तसेच 24 घरकुलांचे गृहप्रवेश, तर कात्रड (ता. राहुरी) येथील 48 घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महिला मेळावा, आरोग्य शिबिर, महिला सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण साळवे, गटविकास अधिकारी नेवासा संजय लाखवाल, राहुरीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तसेच सरपंच, ग्रामसेवक, बचत गटाचे अधिकारी, कर्मचारी, महिला सदस्य, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम हप्ता वितरण केलेल्या नगर जिल्ह्याने गत 3 वर्षात राज्यासाठी दिशादर्शक काम केले असून घरकुल योजनेत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे.
श्रीरामपूर, राहाता, कोपरगावात कॉलनी
प्रधानमंत्री आवास योजनेत 6 हजार 419 भुमिहिन लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्यात आली. आता टप्पा-2 मधील 3 हजार 841 लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे लक्ष आहे. मागील 3 वर्षात जिल्ह्यात 11 गृह संकुले उभारली आहे. तसेच यावर्षीही श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव या तालुक्यातील शेती महामंडळाच्या जागेवर 500 ते 700 घरकुलांची कॉलनी उभारणी करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. कॉलनीमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, विद्युतीकरण, वृक्षारोपण, किचन ओटा इत्यादी भौतिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मंजूर झालेल्या व भूमिपूजन करण्यात आलेली घरकुले शंभर दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी सांगितले.