Friday, May 3, 2024
Homeनगरघोड धरणातून साडेपाच हजार क्युसेकने विसर्ग

घोड धरणातून साडेपाच हजार क्युसेकने विसर्ग

शिरूर |प्रतिनिधी| Shirur

शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरणार्‍या चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणामध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला असून धरणाच्या 10 दरवाज्यातून घोडनदीपात्रात 5 हजार 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच घोड धरणाच्या उजव्या कालव्यातून 80 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अजय वाघ यांनी दिली.

- Advertisement -

गेली पाच दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसाच्या परिणामी हा विसर्ग करण्यात येत आहे. चिंचणी येथील घोड धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 7 हजार 638 दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा 5 हजार 467 दशलक्ष घनफूट आहे. तर मृत पाणीसाठा 2 हजार 172 दशलक्ष घनफूट आहे. धरणाला दोन कालवे असून उजव्या कालव्याची लांबी 30 किमी आणि डाव्या कालव्याची लांबी 84 किमी आहे. घोड धरणातून रांजणगाव औद्योगिक वसाहत, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना, तसेच शिरूर, काष्टी व श्रीगोंदा येथे पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनीद्वारे पाणी नेलेले आहे.

शिरूर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यांतील मिळून तब्बल 20 हजार 500 हेक्टर क्षेत्र या धरणामुळे सिंचनाखाली आहे. शेतीसाठी 145.8 दलघमी इतक्या पाण्याचा वापर केला जातो. धरणाच्या खालच्या बाजूस शिरसगांव काटा, धनगरवाडी, इनामगांव, नलगेमळा, गांधले मळा तांदळी खोरे, तांदळी संगम येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून घोड धरणाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या